२०१४ मध्ये चारही शहरांत शेट्टींची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:47 AM2019-04-20T00:47:58+5:302019-04-20T00:48:03+5:30
राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत ‘इचलकरंजी’, ‘जयसिंगपूर’, ‘पेठवडगाव’, ‘इस्लामपूर’ या ...
राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत ‘इचलकरंजी’, ‘जयसिंगपूर’, ‘पेठवडगाव’, ‘इस्लामपूर’ या शहरांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या पारड्यात झुकते माप टाकले. या चारही शहरांत शेट्टींना मोठी आघाडी मिळाल्याने ते पावणेदोन लाख मताधिक्याचा आकडा गाठू शकले. आता राजकीय समीकरणाबरोबर गणितेही बदललेली आहेत. हे मताधिक्य कायम राखताना शेट्टींची दमछाक होणार आहे.
मागील निवडणुकीत राजू शेट्टी यांना चार शहरांत एक लाख ३३ हजार ७२८, तर कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना एक लाख आठ हजार ५०८ इतकी मते मिळाली होती. चारही शहरांत शेट्टी यांना तब्बल २५ हजार २२० इतके मताधिक्य मिळाले. आता राजकीय गणिते बदलली आहेत. शेट्टी कॉँग्रेस आघाडीकडून, तर भाजप-शिवसेनेकडून धैर्यशील माने रिंगणात आहेत. इचलकरंजीत भाजप आघाडी, पेठवडगावमध्ये युवक क्रांतीची सत्ता आहे. जयसिंगपूरमध्ये राष्टÑवादी, कॉँग्रेसची सत्ता, नगराध्यक्ष भाजपचा आहे. इस्लामपूरमध्ये शिवसेना, भाजपप्रणित विकास आघाडीची सत्ता आहे. इचलकरंजीत राजू शेट्टी यांच्यासाठी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे व राष्टÑवादीने ताकद लावली आहे. तर धैर्यशील माने यांच्यासाठी शिवसेना, माने गट व आमदार सुरेश हाळवणकर यांनी प्रतिष्ठा केली आहे. इस्लामपूरमध्ये शेट्टींसाठी आमदार जयंत पाटील, तर मानेंसाठी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व विकास आघाडी प्रचारात आहे. जयसिंगपूरमध्ये राजेंद्र पाटील-यड्रावकर, गणपतराव पाटील हे शेट्टी यांच्या, तर माने यांच्या पाठीशी नगराध्यक्षा डॉ. निता माने आहेत.
कोणत्या भागात
कोणाचा आहे होल्ड?
इचलकरंजी, इस्लामपूर, जयसिंगपूर, पेठवडगावमध्ये राजू शेट्टी यांना मोठी आघाडी दिली होती.
इस्लामपुरात विकास आघाडी, इचलकरंजीत भाजप मित्रपक्ष आघाडी, वडगावात युवक क्रांतीचे बहुमत आहे. जयसिंगपुरात नगराध्यक्ष भाजप आघाडीचा, बहुमत दोन्ही कॉँग्रेसचे आहे.
शहर राजू शेट्टी कल्लाप्पाण्णा आवाडे
इचलकरंजी ९७,६९१ ७७,८७९
पेठवडगाव ६,४९५ ४,६५४
जयसिंगपूर १३,०९४ ११,७०३
इस्लामपूर १६,४४८ १४,२७२
एकूण १,३३,७२८ १,०८,५०८