दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांशी शेट्टी यांची भेट संविधान मोर्चा तयारी : राजकीय चर्चा झाली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे; ‘संविधान बचाव’च्या भूमिकेतून नेते एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 01:12 AM2018-01-18T01:12:39+5:302018-01-18T01:12:44+5:30
कोल्हापूर : सर्व विरोधी पक्षांतर्फे येत्या २६ जानेवारीस मुंबईत काढण्यात येणाºया ‘संविधान बचाव मोर्चा’च्या तयारीसाठी बुधवारी दुपारी दोन्ही काँग्रेसचे नेते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते
कोल्हापूर : सर्व विरोधी पक्षांतर्फे येत्या २६ जानेवारीस मुंबईत काढण्यात येणाºया ‘संविधान बचाव मोर्चा’च्या तयारीसाठी बुधवारी दुपारी दोन्ही काँग्रेसचे नेते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची भेट झाली. विरोधी पक्षनेते राधाकृ ष्ण विखे-पाटील यांच्या बंगल्यात ही भेट झाली; परंतु त्यामध्ये अन्य कोणतीच अथवा राजकीय चर्चा झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
संविधान मोर्चा नेमका कसा असावा, याचे नियोजन करण्यासाठी झालेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते विखे-पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड व खासदार शेट्टी उपस्थित होते. या मोर्चाला दि. २६ रोजी मुंबई विद्यापीठासमोरील आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात होईल. तो गेटवे आॅफ इंडियासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर येईल. तिथे दोन तास धरणे आंदोलन होईल. हा मोर्चा कुण्याही एका पक्षाचा नाही. ‘संविधान बचाव’ अशी भूमिका असलेले सर्व समाजांतील व सर्व स्तरांतील लोक त्यामध्ये सहभागी होऊ शकतील. त्याला कोणीही एक नेता नाही, एक पक्ष नाही, की एक झेंडा असणार नाही. त्यामध्ये कोणतीही घोषणाबाजी होणार नाही किंवा एकही नेता तिथे भाषणबाजी करणार नाही, अशी आचारसंहिता या बैठकीत निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
खासदार शेट्टी हे केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या आघाडीतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या २०१९ च्या निवडणुकीसाठी भाजपविरोधात देशव्यापी एकजूट करण्याच्या हालचाली सुरू आहेत. शेट्टी यांच्या संघटनेचीही ताकद आता महाराष्ट्रभर वाढली आहे. भाजपला विरोध करणारे शेट्टी हे अन्य पक्षांपासून समान अंतरावर राहणार असल्याचे सांगत असले तरी ते निवडणुकीपर्यंत काहीतरी राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्या घडामोडींची पार्श्वभूमी तयार होण्यासाठी ‘संविधान मोर्चा’च्या निमित्ताने होत असलेली एकजूट कारणीभूत ठरू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
मुंबईत बुधवारी विरोधी पक्षनेते राधाकृ ष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विखे-पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांची बैठक झाली. संविधान मोर्चाच्या तयारीची चर्चा या बैठकीत झाली.