शेट्टी यांचा पाठिंबा हेच ‘गोकुळ’च्या चांगल्या कारभाराचे प्रमाणपत्र; पी. एन. पाटील : तीन तालुक्यांतून ३५० चे मताधिक्य घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:31 AM2021-04-30T04:31:33+5:302021-04-30T04:31:33+5:30

कोल्हापूर : शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळावे म्हणून गेली पंचवीस वर्षे संघर्ष करणाऱ्या माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्तारूढ ...

Shetty's support is a testament to Gokul's good governance; P. N. Patil: Let's get a majority of 350 votes from three talukas | शेट्टी यांचा पाठिंबा हेच ‘गोकुळ’च्या चांगल्या कारभाराचे प्रमाणपत्र; पी. एन. पाटील : तीन तालुक्यांतून ३५० चे मताधिक्य घेऊ

शेट्टी यांचा पाठिंबा हेच ‘गोकुळ’च्या चांगल्या कारभाराचे प्रमाणपत्र; पी. एन. पाटील : तीन तालुक्यांतून ३५० चे मताधिक्य घेऊ

Next

कोल्हापूर : शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळावे म्हणून गेली पंचवीस वर्षे संघर्ष करणाऱ्या माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्तारूढ गटाला दिलेला पाठिंबा हेच ‘गोकुळ’मधील आमच्या कारभाराचे प्रमाणपत्र आहे. त्यामुळे सत्तारूढ गटाचा विजय निश्चित असल्याचा विश्वास या आघाडीचे नेते आमदार पी. एन. पाटील यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा तालुक्यातून‌ ३५० चे मताधिक्य घेणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

येथील वनविसावा सभागृहात आयोजित ठरावधारक मतदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाबासाहेब पाटील सरुडकर होते.

आमदार पाटील म्हणाले, शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते आहेत, अशी त्यांची देशभर प्रतिमा आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी पोलिसांच्या लाठ्या झेलल्या आहेत. या नेत्याला राज्यभरातील अन्य दूध संघांचा कारभार कसा चालतो, हे चांगले माहीत आहे. कोरोनाच्या काळात अन्य दूध संघांनी गाईचा दूध दर कमी केला, परंतु गोकुळ या राज्यातील एकमेव संघाने मात्र लिटरला २७ रुपये दर दिला. या चांगल्या कारभाराची नोंद घेऊनच त्यांनी सत्तारुढ आघाडीला पाठिंबा दिला असल्याने, त्यातून संघाचा कारभार शेतकरीहिताचा सुरू असल्याचे स्पष्ट होते. त्यासाठी इतर कुणाच्या प्रमाणपत्राची आम्हाला गरज नाही. शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यातील मतदार सत्तारूढ आघाडीच्या विजयात निर्णायक ठरतील याची खात्री आहे.

प्रास्ताविक सभापती हंबीरराव पाटील यांनी केले. यावेळी रणजित पाटील, बाबासाहेब पाटील यांची‌ भाषणे झाली. यावेळी महिला उमेदवार अनुराधा पाटील, सभापती विजय खोत उपस्थित होते.

माझ्यापुरते, ही सरुडकरांची संस्कृती नाही

जनतेच्या सेवेत असणाऱ्यांना जय-पराजयाची फिकीर नसते. आपल्या उमेदवारांपुरते मत मागायचे, स्वत:पुरते पाहायचे, ही सरुडकर घराण्याची संस्कृती नाही, असे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी स्पष्ट केले. वारणा दूध संघ सहकारातून कधी मल्टिस्टेट झाला, तिथे संघाच्या सभेत सभासदांना बोलण्याचा अधिकार आहे का, हे कोरे यांनी जाहीर करावे. दुसऱ्याकडे बोट दाखविताना आपल्याकडे चार बोटे असतात, हे विश्वास पाटील ऊर्फ आबाजी यांचे टेलिफोन ऑपरेटर झालेल्यांनी लक्षात ठेवावे.

बापाचे नाव लावणे महाडिक यांच्या रक्तात नाही

ज्यांनी सप्तगंगा साखर कारखान्याचे रात्रीत नामकरण करून त्यास स्वत:च्या वडिलांचे नाव दिले. तेथील जुन्या साडेचार हजार सभासदांना काढून टाकले. असे वाममार्गाने नाव लावण्याचे महाडिक कुटुंबाच्या रक्तात नाही. स्वत: धनदांडगे आहात, तर बंद पडलेला दूध संघ चालवायला घेऊन तो गोकुळप्रमाणे नावा-रूपाला आणून दाखवा, अशी घणाघाती टीका शौमिका महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर केली.

२९०४२०२१-कोल-पीएन पाटील मेळावा

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आंबा (ता. शाहूवाडी) येथे झालेल्या सत्तारूढ आघाडीच्या मेळाव्यात आमदार पी. एन. पाटील यांनी भूमिका मांडली. यावेळी माजी आमदार बाबासाहेब सरुडकर, सत्यजित पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते.

Web Title: Shetty's support is a testament to Gokul's good governance; P. N. Patil: Let's get a majority of 350 votes from three talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.