रिक्षा सेवेसोबत वृक्षवल्ली जपणारे शेवडे मामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:22 AM2021-01-04T04:22:06+5:302021-01-04T04:22:06+5:30
सचिन भोसले - लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे , पक्षिणी सुस्वरे आळवितो’ हा संत ...
सचिन भोसले - लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे , पक्षिणी सुस्वरे आळवितो’ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग वर्षांनुवर्षे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजात आपण ऐकत आलो आहोत. पण तरीसुद्धा वृक्षवल्लीऐवजी काॅंक्रिटचे जंगल वाढविण्यास हातभार लावत आहोत. मात्र, कोल्हापुरातील एक रिक्षामामा महेश शेवडे हे गेल्या १५ वर्षांपासून रिक्षासेवेबरोबरच प्रवाशांना फळझाडांची रोपे मोफत भेट देत आहेत. आतापर्यंत त्यांनी २१ हजारांहून अधिक रोपे मोफत वाटली आहेत. हा त्यांचा स्तुत्य उपक्रम सर्वांसाठी आदर्श ठरत आहे.
कोल्हापूर शहराचा पर्यटन, अर्थिक विकास व्हावा, याकरिता तत्कालिन राज्य सरकारने शहरातील मुख्य रस्ते तयार करण्याचे काम आयआरबी या कंपनीकडे दिले होते. या कंपनीने या विकासकामात अडथळा ठरणारी झाडे कापली. ही बाब न्यू शाहूपुरीतील रिक्षाचालक महेश शेवडे यांना मनाला खटकली. त्या दिवसापासून त्यांनी मिळेल त्या फळझाडांची, पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या अशा बिया गोळा करण्यास सुरुवात केली. त्या बिया घरात आणून त्यापासून रोपे बनविण्यास सुरुवात केली. ही रोपे आपल्या रिक्षातील प्रवासी सीटच्या मागील बाजूला दुधाच्या पिशव्यांमधून भरून तयार केली. रिक्षात बसणाऱ्या प्रवाशाला त्याच्या इच्छेनुसार आवडेल ते रोप मोफत देण्याचा पायंडा पाडला. आतापर्यंत त्यांनी २००५ सालापासून २१ हजारांहून अधिक राेपे प्रवाशांना मोफत वाटली आहेत. त्यांचा हा उपक्रम पाहून गल्लीतील अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आणून देतात. स्वत: शेवडे हे उंबर, करंजी, बदाम, जांभूळ, आंबा, रेन ट्री, रामफळ, पिंपळ अशा बियांची रोपे तयार करून वृक्षप्रेमी प्रवाशांना मोफत वाटतात. त्यांचा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
चौकट
रिक्षामध्ये रोज ते किमान १५ राेपे मोफत देण्यासाठी सज्ज ठेवतात. तर रिक्षाच्या मागील काचेवर त्यांनी ‘झाडे लावा, झाडे जगवा, प्राणी वाचवा, पक्षी वाचवा, पृथ्वीचे संतुलन राखा, नाही तर भविष्यकाळ धोकादायक.... वृक्षमित्र’ अशी लक्ष वेधणारी वाक्ये लिहिली आहेत.
कोट
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण महत्वाची बाब आहे. प्राधान्यक्रमाने त्याला सर्वांनी महत्व देणे गरजेचे आहे.
महेश रघुनाथ शेवडे, वृक्षमित्र रिक्षाचालक, कोल्हापूर
फोटो : ०३०१२०२१-कोल-महेश शेवडे
फोटो : ०३०१२०२१-कोल-रिक्षा
रिक्षाच्या मागील काचेवरील प्रबोधनात्मक वाक्ये
फोटो : ०३०१२०२१-कोल-रिक्षा०२
ओळी : रिक्षाच्या आतमध्ये रोपे ठेवण्यासाठी केलेली सोय