कोल्हापुरातील शिकलगार कुटुंबाकडून ५५ वर्षे श्री गणेश पूजनाचा मान, अध्यक्षपदही मुस्लीम तरुणाकडेच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 12:50 PM2024-09-12T12:50:11+5:302024-09-12T12:50:50+5:30
कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपतींचे सामाजिक समतेचे विचार कोल्हापूरकरांमध्ये इतके भिनलेले आहेत की, कोणी कितीही प्रयत्न केला तरी येथील ...
कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपतींचे सामाजिक समतेचे विचार कोल्हापूरकरांमध्ये इतके भिनलेले आहेत की, कोणी कितीही प्रयत्न केला तरी येथील हिंदू आणि मुस्लीम एकत्र गुण्यागोविंदाने राहत आहेत. एवढेच नाही तर दोन्ही समाजाचे सणवार, उत्सव एकत्र साजरे केले जातात. शिवाजी पेठेतील जुना वाशीनाका येथील श्री शाहू सैनिक तरुण मंडळाचे अध्यक्ष एक मुस्लिी तरुण असून त्याच्या तीन पिढ्या मंडळाच्या गणेशोत्सवातील पूजा, आरती, प्रसाद व आतषबाजीची जबाबदारी एखाद्या व्रताप्रमाणे सांभाळत आहेत.
जुना वाशीनाका येथील शिकलगार कुटुंब निम्म्या कोल्हापूरला परिचित आहे. शोभेची आतषबाजी तयार करण्याचा त्यांचा व्यवसाय असल्याने सगळ्यांच्या आनंदाच्या क्षणी हे कुटुंब सहभागी होत असते. अंबाबाईचा अष्टमीचा रथ असो, वाशीची जत्रा असो की कोणतेही धार्मिक कार्य असो शिकलगारांची आतषबाजी असतेच.
शाहू सैनिक तरुण मंडळाची स्थापना १९६९ मध्ये झाली. तेंव्हा मंडळाची इमारतही नव्हती. पण गणपती उत्सव साजरा करायचे ठरल्यानंतर गणपती कुठे बसवायचा, असा प्रश्न आला तेंव्हा स्वर्गीय चॉंदसाहेब शिकलगार यांनी माझ्या दारात मंडप घालून गणपतीची प्रतिष्ठापना करू, असे सांगितले. तेंव्हापासून पुढील चार-पाच वर्षे त्यांच्याच दारात गणपतीची प्रतिष्ठापना होत राहिली. त्यांची मुलं बादशाहा, बाळासो, बाबासो, मेहबूब, सिकंदर, महंमद ही मुलं रोज गणेशाची पूजा, आरतीची जबाबदारी घेऊ लागली. मूर्तीसमोर देखावे देखील करायला लागले.
पुढे मंडळाची इमारत पूर्ण झाली आणि गणपती इमारतीत बसायला लागला. परंतु पूजेचे काम शिकलगार कुटुंबाकडेच राहिले. गेले ५५ वर्षे हे व्रत त्यांनी सांभाळले आहे. स्व. चाँदसाहेब यांची नातवंडे, परतवंडे आता ही परंपरा पुढे चालवित आहेत. इब्राहिम शिकलगार हा मंडळाचा अध्यक्ष आहे तर अमित शिकलगार व अनिल आगळे रोजच्या पूजेची व्यवस्था बघतात. प्रत्येक वर्षी या कुटुंबाला पूजेचा व नैवेद्य अर्पण करण्याचा मान दिला जातो. गणपती समोर आतषबाजी या कुटुंबाकडून केली जाते. आपण मुस्लीम आहोत हे विसरून मोठ्या हिरीरीने उत्सवात भाग घेत असतात.