चिल्लर पार्टीतर्फे जंगलात पाण्यासाठी श्रमदान
By admin | Published: May 9, 2017 04:36 PM2017-05-09T16:36:40+5:302017-05-09T16:36:40+5:30
पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांचे पुनरुज्जीवन: वनसुरक्षक सोशल फोर्सचे सहकार्य
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ९ : जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत स्वच्छ करुन ते खुले करण्यासाठी चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीच्या सदस्यांनी तीन दिवस शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथील जंगलात श्रमदान केले.
या मोहिमेचे उद्घाटन प्रा. एस. आर. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमोद माळी यांनी सर्वांचे स्वागत केले. माणूस आणि निसर्ग, प्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत स्वच्छ करुन ते खुले करण्याचे काम आंबा येथील वनसुरक्ष सोशल फोर्स करीत आहे. गेली तीन वर्षे या संस्थेने हा उपक्रम सुरु ठेवला आहे.
या उपक्रमात कोल्हापुरातील चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीच्या सदस्यांनी सक्रीय सहभाग घेत आंबा येथे सुरु असलेल्या तीन दिवसीय श्रमदान केले.
निसर्गातील हस्तक्षेपामुळे माणूस अनेक संकटे स्वत:वर ओढवून घेत आहे. प्रचंड प्रमाणात वाढलेला उष्मा हा या हस्तक्षेपाचाच एक भाग आहे. उष्म्यामुळे सगळीकडच्याच पाण्याचा साठा कमी होत चालला आहे. यातच माती, पालापाचोळा आणि मानवी हस्तक्षेप यामुळे जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत मुजले जात आहेत. यामुळे पाण्यासाठी जंगलातील प्राणी मानवी वस्तीत शिरत आहेत. शिवारात त्यांना चारा आणि पाणी दोन्ही मिळते, त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होते आणि निसर्ग आणि माणसातील संघर्ष सुरु होतो, असे मत प्रा. पाटील यांनी व्यक्त केले.
या शिबिरात जलस्त्रोत खुले करण्याबरोबरच प्राण्यांसाठी चिखलाची लोळण तयार करण्याचेही काम केले. चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीचे मिलिंद यादव, देविका बकरे, नसीम यादव, शिवप्रभा लाड, आरती कोपार्डेकर, जयसिंग चव्हाण यांनी भाग घेतला.