अहिंसेमुळे नर्मदा लढ्याला धार- शिल्पा बल्लाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 03:15 PM2019-08-23T15:15:12+5:302019-08-23T15:17:15+5:30
नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या सरदार सरोवर धरणामुळे ५० हजार कुटुंबांना विस्थापित व्हावे लागले. हक्काचे घर, जमीन, पाण्यासाठी त्यांचा गेली ३५ वर्षे लढा सुरू आहे. आदिवासींमधील अहिंसा आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यामुळे या लढ्याची धार अजूनही बोथट झालेली नाही, असे मनोगत निर्मात्या-दिग्दर्शक शिल्पा बल्लाळ यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर : नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या सरदार सरोवर धरणामुळे ५० हजार कुटुंबांना विस्थापित व्हावे लागले. हक्काचे घर, जमीन, पाण्यासाठी त्यांचा गेली ३५ वर्षे लढा सुरू आहे. आदिवासींमधील अहिंसा आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यामुळे या लढ्याची धार अजूनही बोथट झालेली नाही, असे मनोगत निर्मात्या-दिग्दर्शक शिल्पा बल्लाळ यांनी व्यक्त केले.
शाहू स्मारक भवनात कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीतर्फे नर्मदा बचाव आंदोलन आणि तेथील आदिवासींच्या स्थितीवर शिल्पा बल्लाळ निर्मित ‘लकीर के इस तरफ’ या माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, मी या आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ता नाही. मेधातार्इंच्या चळवळीची सुरुवात झाली त्या मणिबेली येथे त्यांच्यासोबत जाण्याची संधी मला मिळाली आणि मी या विषयाशी जोडले गेले. जुलैै २०१८ ते मे २०१९ या कालावधीत या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी २४५ गावे पाण्याखाली गेली. आजही या विस्थापितांचे पुनर्वसन झालेले नाही.
हातात तीर-कमान असूनही हे आदिवासी शांतपणे सरकारशी लढा देत आहेत. माझ्या नजरेतून उलगडलेला लढा मी या माहितीपटातून मांडत आहे. ‘नर्मदा आंदोलन’ हे केवळ नाव माहीत असलेल्या आणि हे आंदोलन आता संपले आहे, असे समजणाऱ्या शहरातील सर्वसामान्य माणसांना याचे वास्तव समजावे, अशी माझी अपेक्षा आहे. अनघा पेंढारकर यांनी स्वागत केले. उदय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.