शिवारं तयार ! शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे
By admin | Published: June 1, 2016 12:46 AM2016-06-01T00:46:00+5:302016-06-01T00:54:05+5:30
पेरण्या खोळंबल्या : मान्सूनचाही अंदाज येत नसल्याने बळिराजा चिंतेत; ५४८ हेक्टरवर भाताची धूळवाफ पेरणी
कोल्हापूर : यंदाच्या उन्हाळ्यात अपवाद वगळता एकही मोठा वळवाचा पाऊस झालेला नाही. आजही भाजून काढणारे ऊन आहे. पावसाची चाहूल लागली नसल्याने शेतकरी पेरणीसाठी थांबला आहे. पावसाचे वातावरण झाल्यावर पेरणीसाठी लगीनघाई सुरू होते; परंतु ते चित्र अजून पाहायला मिळत नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ५४८ हेक्टर क्षेत्रात भाताची धूळवाफ पेरणी झाली आहे.
यंदाच्या हंगामात पाऊसमान भरपूर असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. सोशल मीडियावरही त्याचेच चित्र रंगविले जात आहे; परंतु शेतकऱ्यांना त्याचे काही खरे वाटत नाही. जेव्हा हवामान खाते पाऊस जास्त आहे म्हणून सांगते तेव्हा त्याच्या उलटाच अनुभव येत असल्याचे त्यांचे म्हणणे असते. गेल्या वर्षीही पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे जमिनीची तहान भागली नाही. यंदाच्या उन्हाळ्यात प्रचंड उष्मा होता. त्यामुळे एक-दोन तर चांगले वळीव होतील, अशी अपेक्षा होती; परंतु काही तालुके वगळता असा पाऊस झालेला नाही. चांगले वळीव झाले की शेती मशागतीसाठी सहज तयार होते. नांगरटीनंतर निघणारी ढेकळे नुसत्या मशागतीने फुटत नाहीत. त्यासाठी पावसाची गरज असते. मातीलाही फूल येते. शेतकऱ्याचे कष्ट थोडे कमी होतात; परंतु यंदा त्यातले काहीच घडलेले नाही.
बुधवारी मे संपून जून सुरू होत आहे. जून म्हटले की पावसाळा सुरू झाला असे म्हटले जाई; परंतु पावसाळा सोडाच, त्याची चाहूलही अद्याप लागलेली नाही. सायंकाळनंतर थोडे गार वारे सुटते; परंतु त्यालाही जोर नाही. यंदा ७ जूनला मृग नक्षत्र सुरू होते. त्याचे वाहन बेडूक आहे. पाऊस पडून गेल्यावर एकतर हवेतील उष्मा कमी होतो. लोकांनाही थोडे सुसह्य वाटते. पिण्याच्या पाण्याची काही प्रमाणात चिंता मिटते. जनावरांच्या पाण्याची सोय होते; परंतु यंदा यातले काहीच घडलेले नाही. त्यामुळे बहुतेक गावांतील माळामुरुडाची पिके वाळून गेली आहेत. जी नदी व विहिरीच्या पाण्यावर तगून आहेत, त्यांच्याही वाढीवर परिणाम झाला आहे.
वळवाचा पत्ता नाही आणि मोसमी पावसाचेही ढग अजून जमा होईना झाले आहेत. आता कुठे अंदमानात पाऊस आल्याच्या बातम्या आहेत. केरळमध्ये १ जूनला पाऊस आल्यावर तो आपल्याकडे यायला आठवडा लागतो. त्यामुळे सध्याचे स्वच्छ वातावरण पाहून पाऊस यायला दहा जून उजाडेल की काय, अशी भीती शेतकऱ्याच्या मनात आहे. त्यामुळेच शेतजमीन तयार करून तो थांबला आहे. याचा परिणाम म्हणून अद्याप पेरणीला जोर लागलेला नाही.
शेतकऱ्यांनी बी-बियाणे आणले आहे; परंतु पाऊस नसल्याने तो आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. पाऊस नाही. नदीत पाणी आहे; परंतु वीज नाही. त्यामुळे रोपलागणीसाठी तरवे टाकता आलेले नाहीत. शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
- विठ्ठल पाटील, शेतकरी, पाटपन्हाळा, ता. पन्हाळा
पावसाचा काहीच मागमूस नाही. त्यामुळे पेरणी करून धोका पत्करायला शेतकरी तयार नाहीत. साधारणत: मृग सुरू झाल्यानंतर त्याचा रागरंग पाहून पेरणीस गती येईल.
- सुरेश मगदूम, कृषी उपसंचालक