‘शिमग्या‘मुळे ‘गोकुळ’च्या गाठीभेटी थंडावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:13 AM2021-03-30T04:13:46+5:302021-03-30T04:13:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : दोन दिवस होळीचा (शिमगा) सण असल्याने ‘गोकुळ’च्या गाठीभेटी पूर्णपणे थंडावल्या होत्या. दोन्ही गटांकडून आज, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दोन दिवस होळीचा (शिमगा) सण असल्याने ‘गोकुळ’च्या गाठीभेटी पूर्णपणे थंडावल्या होत्या. दोन्ही गटांकडून आज, मंगळवारपासून पुन्हा बैठकांचा धडाका सुरू होणार आहे. त्यामुळेच आमदार प्रकाश आबिटकर यांचा पाठिंब्याबाबतचा निर्णय आज होणार आहे.
‘गोकुळ’ची निवडणूक जाहीर झाल्यापासून सत्तारूढ व विरोध आघाड्यांचा गाठीभेटी, बैठकांचा जोर सुरू होता. आघाडीतील फोडाफोडीबरोबरच नवीन समीकरणांसाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. रात्री बारा, एकपर्यंत नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरूच होते. मात्र, रविवारी होळी व सोमवारी धूलिवंदन असल्याने दोन दिवस या घडामोडींना ब्रेक लागला होता. ‘शिमग्या’च्या तोंडावर काहीच चर्चा करायची नाही, अशी मानसिकता नेत्यांची असल्याने आजपासून पुन्हा बैठकांचा धडाका सुरू होणार आहे.
आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गाठीभेटी सुरू होतील. दरम्यान, आमदार प्रकाश आबिटकर यांना आपल्याकडे ओढण्यासाठी दोन्ही गटांकडून प्रयत्न सुरू आहेत. आमदार आबिटकर यांनी खासदार संजय मंडलिक यांची भेट घेऊन आपली भूमिका सांगितल्याचे समजते. सत्तारूढ गटाकडूनही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आज भूमिका जाहीर करू, असे त्यांनी संबंधितांना सांगितल्याचे समजते.