शिंदे गटाच्या कोकणातील दलालांकडून आमिषे दाखवून शिवसैनिक फोडण्याचा प्रयत्न, संजय पवारांचा आरोप
By इंदुमती सूर्यवंशी | Published: July 22, 2022 05:46 PM2022-07-22T17:46:51+5:302022-07-22T17:47:58+5:30
महाराष्ट्रातील मराठी माणसाला, हिंदूंना न्याय देण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली. पण, काही लोक याचा फायदा सत्ता व पैशासाठी करून घेण्यासाठी बाजूला गेले
कोल्हापूर : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करत राज्यात भाजप सोबत सत्ता स्थापन केली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे शिवसेनेत दोन गट पडले. सद्या शिंदे गटात सामील होणाऱ्याची संख्या वाढत आहे. यातच कोल्हापूरचेशिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे.
कोकण, रत्नागिरीतील शिंदे गटाचे दलाल कोल्हापुरातील शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांना पैसा आणि पदाचे आमिष दाखवत असल्याचा आरोप संजय पवार यांनी केला. कोल्हापूरचा शिवसैनिक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा निष्ठावंत आहे. त्यांच्या जीवावर तुम्ही आमदार, मंत्री झालात ती शिवसेना फोडण्याचे पाप करू नका आणि आपल्या विधानसभा, लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडून येऊन दाखवा, असा टोलाही लगावला.
संजय पवार म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व प्रबोधनकारांनी ५६ वर्षांपूर्वी आपल्या कुटुंबासाठी नव्हेतर, महाराष्ट्रातील मराठी माणसाला, हिंदूंना न्याय देण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली. पण, काही लोक याचा फायदा सत्ता व पैशासाठी करून घेण्यासाठी उद्धव साहेबांचा घात करून त्यांना धोका देऊन बाजूला गेले, त्यांचा आम्ही कायम निषेधच करू.