VidhanSabha Election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमध्ये शिंदेसेनाच मोठा भाऊ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 02:26 PM2024-10-17T14:26:52+5:302024-10-17T14:27:49+5:30
नेते, इच्छुक मुंबईत, कार्यालयात शुकशुकाट
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमधील शिंदेसेना उमेदवारीमध्ये मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्यला प्रत्येकी दोन जागा मिळणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र शिरोळ विधानसभेसाठी महायुती नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या विधानसभेला भाजपचा दणकून पराभव झाला होता. त्यामुळे आणखी एखादी जादा जागा मिळवण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. कोल्हापूर दक्षिणमधून अमल किंवा शौमिका महाडिक आणि इचलकरंजीतून राहुल आवाडे यांची उमेदवारी निश्चित आहे. हे दोनच मतदारसंघ भाजपकडे राहणार आहेत यात शंका नाही. कोल्हापूर उत्तर, राधानगरी आणि करवीर हे म्हणजे सर्वाधिक तीन मतदारसंघ शिंदेसेनेला मिळण्याची शक्यता आहे. येथून राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर आणि चंद्रदीप नरके हे उमेदवार असतील.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर झालेल्या चर्चेत कोल्हापूर उत्तर घ्याच असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होता. शिंदेसेनेकडे जर ही जागा गेली तर सत्यजित कदम काय करणार हा खरा प्रश्न आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर घेण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
कागल आणि चंदगड विधानसभा मतदारसंघांतून हसन मुश्रीफ आणि राजेश पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे. तर पन्हाळा आणि हातकणंगले येथून जनसुराज्यचे अनुक्रमे विनय कोरे आणि अशोकराव माने रिंगणात असतील. २०१९ ला शिरोळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले राजेंद्र पाटील यड्रावकर हे उद्धवसेनेकडे गेले. शिंदे यांच्या बंडानंतर ते महायुतीसोबत राहिले. परंतु ते पुन्हा आपल्याच शाहू आघाडीतून रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी महायुती नेमकी काय भूमिका घेणार हे महत्त्वाचे आहे.
नेते, इच्छुक मुंबईत, काँग्रेस कार्यालयात शुकशुकाट
निवडणूक कधी होणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांसह जनतेलाही लागून राहिली होती. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर ही उत्सुकता मंगळवारी संपुष्टात आली. राजकीय पटलावरील हालचाली गतिमान झाल्या आहेत. काँग्रेसचे नेते, इच्छुक उमेदवार मुंबईस गेल्याने काँग्रेस पक्षाच्या स्टेशनरोडवरील कार्यालयात बुधवारी शुकशुकाट दिसून आला.
निवडणूक लोकसभेची असो, विधानसभेची असो, की स्थानिक स्वराज्य संस्थांची असो. निवडणूक जाहीर झाली की, पक्ष कार्यालयात इच्छुक तसेच कार्यकर्त्यांची वर्दळ वाढलेली पाहायला मिळते. संपूर्ण निवडणूक काळात पक्ष कार्यालयातूनच निरोप देणे - घेणे, प्रचाराचे साहित्य देेणे, प्रचार, पदयात्रांचे नियोजन ठरते. त्यामुळे पक्ष कार्यालयातील वर्दळ, लगबग वाढलेली असते. बुधवारी मात्र निवडणूक जाहीर झाल्यानंतरचा पहिला दिवस याला अपवाद ठरला.
निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्यांनी वेगवेगळ्या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. जागा वाटप आणि उमेदवाराची नावे निश्चित करण्यासंदर्भात आयोजित बैठकीच्या निमित्ताने आमदार सतेज पाटील बुधवारी मुंबईत होते. त्यामुळे नेहमीची अजिंक्यतारा कार्यालयातही गर्दी दिसली नाही.