कोल्हापुरात गाड्या खरेदीसाठी उडाली झुंबड
By admin | Published: April 1, 2017 01:05 AM2017-04-01T01:05:33+5:302017-04-01T01:05:33+5:30
दुपारीच काही शोरूमचे ‘शटर डाऊन’ : ‘बीएस-३’च्या सर्व हजर स्टॉक गाड्यांची तडाखेबंद विक्री
कोल्हापूर : बीएस-३ इंजिन असलेल्या गाड्यांची खरेदी-विक्री आणि नोंदणी केवळ शुक्रवारपर्यंतच करता येणार असल्याने अशा दुचाकी व चारचाकी गाड्या खरेदीसाठी वाहन विक्रेत्यांच्या दारात ग्राहकांची झुंबड उडाली होती. मात्र, दुपारपर्यंतच काही विक्रेत्यांनी स्टॉकमधील गाड्या संपल्याचे बोर्ड लावल्याने अनेकांची निराशाही झाली.
भारत स्टेज-४ (बीएस ४) या मानके असलेलीच वाहने आज, शनिवारपासून विक्रेत्यांना विकता येणार आहेत. या निर्णयामुळे शुक्रवारी दिवसभर भारत स्टेज-३ मानके असलेल्या दुचाकीसह चारचाकी गाड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्यात अगदी पाच हजारांपासून ते ४० हजारांपर्यंतची सवलत देण्यात आली.
सवलत दिल्याने कमी झालेल्या किंमतीत गाडी घेण्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून काही वाहन विक्रेत्यांच्या दारात ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. सकाळी अकरानंतर विक्रेत्यांच्या सवलतींमुळे रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. मॉडेलनुसार पाच हजारांपासून ४० हजारांपर्यंत काही विक्रेत्यांनी सूट दिल्याने या ‘बीएस-३ मानके’ असलेल्या गाड्यांच्या खरेदीसाठी झुंबड उडाली होती. ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे वाहन विक्रेत्यांना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास स्टॉक संपल्याचे बोर्ड लावावे लागले, तरीही ग्राहक विक्रेत्यांच्या दारातून हलत नव्हते. विशेषत: होंडा, टीव्हीएस, यामाहा, बजाज, हिरो या कंपन्यांच्या गाड्या खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती.
०१ एप्रिल पासून बीएस-४ मानकांची पूर्तता न करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या (दुचाकी, तीन चाकी, चारचाकी किंवा व्यापारी) वाहनांची विक्री वाहन उत्पादक किंंवा विक्रेत्यांना करता येणार नाही. १ एप्रिलपासून बी.एस.-४ मानके नसलेली कोणतीही वाहने नोंदणी करता येणार नाहीत . जर वाहनांची विक्री ३१ मार्च २०१७ ला अथवा त्यापूर्वी केली असेल, तर वाहन विक्रीचा पुरावा सादर केल्यानंतर नोंदणी करता येणार आहे. त्यात फॉर्म नं.२१, इनव्हॉईस बिल, विमा प्रमाणपत्र, तात्पुरती नोंदणीपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल.
- डॉ. डी. टी. पवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी.
गाडीवर किती सूट
ड्युएट, मेस्ट्रो एज, प्लेजर-१२,५००, एचएफ डिलक्स सीरिज, स्प्लेंडर प्लस - ५,०००, ग्लॅमर एक्स्प्रो, आय स्मार्ट १०००-७,५००, ज्युपिटर- ९,०००, व्हिक्टर - ९,०००, स्कुटी - ५,०००, अपाची - ९,०००, एक्स एल १००- ५,०००, टीव्हीएस विगो-
८,०००, फिनिक्स - १२,०००, अॅक्टिव्हा ३ जी - १३,०००, सीबीआर स्पोर्टस् बाईक - २२,०००, होंडा नवी- २०,०००.
आरटीओकडे १२९९ वाहनांची झाली नोंद
बीएस-३ इंजिन असलेल्या दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांची शुक्रवारी मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्यातील शुक्रवारी सायंकाळपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे दुचाकी-११७८, चारचाकी-४७, अवजड मालवाहतुकीची वाहने-७४ अशा १२९९ वाहनांची नोंद झाल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक गोपाळे यांनी दिली. प्रत्यक्षात वाहनांची विक्री तडाखेबंद झाल्याचे चित्र दिवसभर दिसले.