जिल्ह्याबाहेरही शिरोळचा आवाज!
By admin | Published: May 29, 2017 12:41 AM2017-05-29T00:41:44+5:302017-05-29T00:41:44+5:30
जिल्ह्याबाहेरही शिरोळचा आवाज!
गणपती कोळी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरुंदवाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुणे ते मुंबई आत्मक्लेश पदयात्रा सुरूकेली आहे. सुजलेले पाय, पायाला उठलेले फोड अन् ऐन संघर्षात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोडलेली साथ अशा परिस्थितीतही नागरिकांतून शेट्टी यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्याबाहेर प्रथमच काढलेल्या या पदयात्रेतून शिरोळ तालुक्याचा आवाज घुमतो आहे.
खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ तालुक्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन करून शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे लढणारा एकमेव शेतकरी नेता अशी त्यांनी स्वत:ची प्रतिमा निर्माण केली आहे. ऊस उत्पादकांमध्ये जागृती निर्माण करून साखर कारखानदार व प्रसंगी शासनाविरोधात एकजूट होत ताकद निर्माण केल्याने उसाला चांगला भाव मिळवून देण्यात शेट्टी यशस्वी झाले. चळवळीला राजकीय ताकदही तितकीच महत्त्वाची मानून २००४ साली शिरोळ विधानसभा केवळ शेतकऱ्यांच्या जिवावर लढविली. राजकीय शक्ती, धनाढ्य उमेदवार, प्रस्थापितांच्या विरोधातही केवळ शेतकरी, कष्टकरी मतदारांनी एक व्होट, एक नोटही देत मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून दिले.
खासदार शेट्टी यांचा वारूरोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष, साखर कारखानदार यांनी जातीपासून ते पैशापर्यंत ताकद लावली. मात्र, शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहिल्याने खासदार शेट्टी यांना मागे वळून पाहावे लागले नाही. दुधाला दर मिळावा यासाठी दहा वर्षांपूर्वी खासदार शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून अकरा दिवसांची आत्मक्लेश यात्रा काढली होती. जिल्ह्यातील व शेतकरी नेता म्हणून त्यांच्या पदयात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी ऊस, कापूस, तूरडाळी यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राज्यभर सभा गाजविल्या असल्या तरी स्वत:च्या कार्यक्षेत्रातील कोल्हापूर जिल्हा सोडून प्रथमच पुणे ते मुंबई पदयात्रा काढली आहे.
शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, उसाचा दुसरा हप्ता त्वरित द्या, मायक्रोफायनान्स कंपनीच्या जाचातून मुक्त करा, या प्रमुख मागण्यांसाठी पुणे ते राजभवन आत्मक्लेश पदयात्रा २२ मे पासून चालू केली आहे. ऐन संघर्षाच्या काळात संघटनेचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी साथ सोडल्याने आंदोलनाच्या नेतृत्वाची जबाबदारी एकट्यावर पडली आहे. मात्र, त्यांच्या एकटेपणाची जाणीव होऊ नये, यासाठी या पदयात्रेत शिरोळ तालुक्यातील हजारो शेतकरी कार्यकर्ते खर्डा-भाकरी, लोणच्याचा ढिगारा घेऊन पदयात्रेतील लोकांच्या सेवेसाठी जात आहेत.
आपल्या तालुक्यातील लोकांच्या पाठबळाने खासदार शेट्टी भारावून जात आहेत. त्यातच शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता न्याय मिळवून देण्यासाठी पायी जात असल्याने पुणे ते मुंबई मार्गावरील ग्रामस्थ खासदार शेट्टी यांचे स्वागत करून पदयात्रेत सहभागी होत असल्याने शेट्टी यांना सुजलेले पाय, पायाला उठलेले फोड याच्या वेदना लोकांच्या प्रेमात विरून जात आहेत. त्यामुळे खासदार शेट्टी यांच्या पदयात्रेने शिरोळ तालुक्याचा आवाज पुणे ते मुंबई मार्गावर घुमत आहे.