शिर्डी देवस्थानकडून लॉकर्स मागविणार

By admin | Published: October 9, 2015 12:36 AM2015-10-09T00:36:39+5:302015-10-09T00:39:22+5:30

अंबाबाई मंदिराची पाहणी : जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आयुक्त यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक

Shirdi Temple will ask for lockers | शिर्डी देवस्थानकडून लॉकर्स मागविणार

शिर्डी देवस्थानकडून लॉकर्स मागविणार

Next

कोल्हापूर : नवरात्रौत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या परस्थ भाविकांच्या बॅगांसाठी लॉकर्सची सिस्टीम कुठून आणणार, कोण बसविणार आणि ते हाताळण्याची जबाबदारी कोण स्वीकारणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. मंदिराशी सर्वच यंत्रणांनी त्यात असमर्थता दर्शविल्याने शिर्डी देवस्थानकडे असलेल्या लॉकर्सची तात्पुरती मागणी करण्यात येणार आहे.
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमी गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, आयुक्त पी. शिवशंकर यांनी अंबाबाई मंदिराची पाहणी केली. त्यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे, व्यवस्थापक धनाजी जाधव, सुदेश देशपांडे, सदस्या संगीता खाडे, पुजारी गजानन मुनिश्वर, मयूर मुनिश्वर, केदार मुनिश्वर, ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे आदी उपस्थित होते. मात्र, ही बैठक कोणत्याही ठोस निर्णयाविना पार पडली.
मंदिरात बॅगा नेण्यास मनाई आहे. त्यामुळे भाविकांना बॅगा ठेवायच्या कुठे हा प्रश्न निर्माण होणार आहे. देवस्थानचे लॉकर्स अपुरे पडतात. त्यामुळे वाढीव लॉकर्सची सोय करावी लागणार आहे पण हे लॉकर्स आणणार कुठून, आणले तर ठेवणार कुठे हा प्रश्न आहे. त्यासाठी शेतकरी बझारच्या जागेचा विचार झाला. मात्र, लॉकर्सची सिस्टीम राबविणार कोण, भाविकांच्या बॅगा त्यातील साहित्याच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विचारला. त्यावेळी स्वयंसेवी संस्थांसह महापालिका, देवस्थान, या सगळ््यांनीच त्याला नकार दर्शविला. त्यामुळे लॉकर्सवर कोणताही निर्णय झाला नाही. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयावर शिर्डी देवस्थानकडेफिरते लॉकर्स आहेत हे लॉकर्स आणि त्यांची यंत्रणा नवरात्रौत्सव काळात अंबाबाई मंदिरात देता येईल का याविषयी शिर्डी देवस्थानशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगितले. भाविकांच्या सोयीसाठी देवस्थानच्यावतीने बिंदू चौक पार्किंग व विद्यापीठ गेट येथे स्वच्छतागृहांची सोय करण्यात येणार आहे. दिलीप देसाई यांनी पॉप्युलर स्टीलच्यावतीने उभारण्यात येणारी मूर्ती व बॅरिकेटसमुळे परिसरात गर्दी होते व भाविकांना अडथळा होत असल्याचे सांगितले. यावरही काही तोडगा काढण्यात आला नाही. बैठकीत सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस कुमक, सुरक्षा यंत्रणा यावर चर्चा झाली नाही. (प्रतिनिधी)


पाण्यासाठी वाढीव टाक्या
गेल्या काही दिवसांपासून मंदिरात पाण्याची टंचाई भासत आहे. मंदिराच्या बाह्य परिसरात प्रजासत्ताक संस्थेतर्फे पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे, तर मंदिर परिसरात देवस्थान समितीतर्फे भाविकांना पाणी देण्यात येणार आहे. त्यासाठी समितीतर्फे जास्त क्षमतेच्या दोन टाक्या मंदिर परिसरातील उद्यानात ठेवण्यात येणार आहेत. या टाक्या रात्री टँकरने भरल्या जातील. दिवसभर त्यातून पाणीपुरवठा केला जाईल. वापरासाठीच्या पाण्यासाठी अन्य एक कनेक्शन घेण्यात येणार आहे.


पार्किंगची ठिकाणे
मंदिराजवळ जाणाऱ्या सगळ््या रस्त्यांवर चार चाकी व रिक्षांना बंदी करण्यात आली आहे. शिवाजी चौकापासून या वाहनांना बंदी असेल. फक्त अपंगांना हा नियम लागू नसेल शिवाय त्यांच्यासाठी व्हील चेअर्सची सोय करण्यात येणार आहे. पार्किंगची अन्य ठिकाणे पुढीलप्रमाणे शिवाजी स्टेडियम, मेन राजाराम शाळेचे मैदान, गांधी मैदान, बिंदू चौक, पेटाळा, प्रायव्हेट हायस्कूल ग्राऊंड, सुसर बागेतील मनपा शाळा.



स्वतंत्र बैठका
पालखीच्यावेळी चेंगराचेंगरीचे प्रसंग उद्भवतात. यावेळी स्वयंसेवक म्हणून काही मंडळांचे कार्यकर्ते येतात त्यांची संख्या ५० च्या आसपास असते. मात्र, प्रत्येकजण आपल्या मनाप्रमाणे काम करत असल्याने भाविकांच्या गर्दीचे नियोजन होण्याऐवजी या कार्यकर्त्यांमुळेच गोंधळ जास्त होत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे या मंडळाच्या कार्यकर्त्यांची स्वतंत्र बैठक घेऊन पालखी सोहळ््याचे नियोजन करण्यात येणार आहे. दोन वर्षांपूर्वी देवस्थान समितीचे सुरक्षा रक्षक व पोलीस कर्मचारी यांच्यात वादावादी झाली होती. त्यामुळे काही काळ पोलिसांनी मंदिरातील सुरक्षा व्यवस्था काढून घेतली होती. असा प्रसंग पुन्हा उद्भवू नये म्हणून देवस्थानचे सुरक्षा रक्षक, खासगी सुरक्षा कंपनीचे कर्मचारी, व्हाईट आर्मीचे जवान व पोलिसांची स्वतंत्र बैठक होणार आहे.




महिलांचीही तपासणी....
मंदिरात जाताना चारही दरवाज्यांवर प्रत्येक भाविकांची तपासणी करण्यात येणार आहे. महिलांच्या तपासणीसाठी विशेष कक्ष स्थापण्यात येणार आहे.


फ्लेक्स बोर्ड
लॉकर्स सिस्टीमची सोय कितपत होईल याबद्दल साशंकता आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी मंदिरात कोणकोणत्या वस्तूंना बंदी आहे याचे फलक लावण्यात येणार आहेत. पार्किंगची ठिकाणे, मंदिराचे चारही दरवाजे, मुख्य दर्शनरांगा येथे हे फलक लावले जातील.

Web Title: Shirdi Temple will ask for lockers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.