शिरदवाडच्या एकास जन्मठेप
By admin | Published: March 17, 2015 10:48 PM2015-03-17T22:48:29+5:302015-03-18T00:07:28+5:30
पत्नीचा खून : अति. सत्र न्यायालयाचा निकाल
जयसिंगपूर : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याप्रकरणी शिरदवाड (ता. शिरोळ) येथील सिद्राम बच्चाराम कांबळे (वय ३९) याला जन्मठेपेची शिक्षा मंगळवारी येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुनावली. न्यायाधीश सी. डी. गोंगले यांनी हा निकाल दिला. मे २०१२ साली ही घटना घडली होती.अधिक माहिती अशी, सिद्राम कांबळे हा पत्नी गीता हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन वारंवार मारहाण करीत होता. याला कंटाळून ती रूई येथे माहेरी गेली होती. त्याठिकाणीही त्याने जाऊन मारहाण केली होती. त्यानंतर सिद्राम व गीता हे दोघेजण शिरदवाड येथे राहण्यास आल्यानंतर त्याला कावीळ झाल्याने दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २ मे २०१२ रोजी उपचार घेऊन घरी आल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास आरोपीची आई जळण आणण्यासाठी बाहेर गेली होती, तर मुलगा सुशांत हा बाहेर खेळत असताना घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन आरोपीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वर्मी वार करून जखमी केले होते. यामध्ये गीता हिचा मृत्यू झाला.दरम्यान, आरोपीने चिठ्ठी लिहून स्वत:लाही पोटावर चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी या गुन्हाचा तपास केला होता. सरकार पक्षातर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये आरोपीची आई व मुलगा यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी वकील व्ही. जी. सरदेसाई यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश गोंगले यांनी आरोपीला जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)