शिरगाव-मुसळवाडी रस्त्याची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:25 AM2021-09-27T04:25:59+5:302021-09-27T04:25:59+5:30
करवीर व राधानगरी तालुक्यांतील जोडणारा आरे-पिरळ हा महत्त्वाचा रस्ता असून, या मार्गावरील शिरगाव ते मुसळवाडी दरम्यानच्या रस्त्यावर ...
करवीर व राधानगरी तालुक्यांतील जोडणारा आरे-पिरळ हा महत्त्वाचा रस्ता असून, या मार्गावरील शिरगाव ते मुसळवाडी दरम्यानच्या रस्त्यावर गेले कित्येक दिवस झाले मोठमोठे खड्डे पडले आहेत.
या रस्त्यावरून मोठमोठ्या वाहनांची ये-जा असते. जिल्हा परिषद की सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अखत्यारित असलेल्या या रस्त्याला सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसांत वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन वाहने चालवावे लागते. अनेक ठिकाणी दोन फूट खोल व लांब मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यांत खड्डा की खड्ड्यात रस्ता हे काय कळत नाही. शिरगाव हे गाव उंचवट्यावर डोंगरसदृश स्थितीवर वसलेले आहे. त्यामुळे पावसाचे, नाल्यातील इतर सांडपाणी थेट या मार्गावर येते. रस्त्याच्या दुतर्फा नाले, गटारी नसल्याने अशी अवस्था झाली आहे. वाहनधारक कधी पडतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या रस्त्याला लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य आहेत की नाही, बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या निदर्शनास या रस्त्यावरील खड्डे दिसतात का नाही? असा संतप्त सवाल जनतेतून व्यक्त होत असून, एखादा मोठा अपघात झाला तरच लक्ष देणार आहेत काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
फोटो : शिरगाव-मुसळवाडी रस्त्यावर असे अनेक खड्डे पडले असून, वाहनधारक अशी कसरत करीत आहेत.