शिरीष बेरी यांना ‘वसुंधरा सन्मान’

By admin | Published: October 7, 2015 12:50 AM2015-10-07T00:50:22+5:302015-10-07T00:51:31+5:30

गुरुवारपासून प्रारंभ: रंगणार किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिव्हल

Shirish Beri gets 'Vasundhara Samman' | शिरीष बेरी यांना ‘वसुंधरा सन्मान’

शिरीष बेरी यांना ‘वसुंधरा सन्मान’

Next

कोल्हापूर : कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी व किर्लोस्कर उद्योग समूहातर्फे गुरुवार (दि. ८) पासून सहाव्या किर्लोस्कर वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला प्रारंभ होत आहे. त्याअंतर्गत ज्येष्ठ आर्किटेक्ट शिरीष बेरी यांना ‘वसुंधरा सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविले जाणार असल्याची माहिती किर्लोस्कर आॅईल इंजिन्सचे जनरल मॅनेजर (मशीन शॉप) संजय बाबर, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शाहू स्मारक भवनमध्ये संध्याकाळी ६ वाजता प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त सदस्य सचिव डॉ. दिलीप बोरालकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. किर्लोस्कर आॅईल इंजिन्सचे जॉर्इंट मॅनेजिंग डायरेक्टर आर. आर. देशपांडे यांची यावेळी उपस्थिती असेल. त्यानंतर डेव्हिड टनबरो दिग्दर्शित ‘फिश’ या लघुपटाने महोत्सवाला प्रारंभ होईल. महोत्सवाच्या रविवारी (दि.११) संध्याकाळी होणाऱ्या सांगता समारंभात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, किर्लोस्कर आॅईल इंजिन्सचे व्हाईस प्रेसिडेंट शंतनू धर यांच्या प्रमुख उपस्थितीत बेरी यांना पुरस्काराने गौरविले जाईल.
बेरी चार दशकांहून अधिक काळ वास्तुविद्याविशारद म्हणून कार्यरत असून त्यांनी जीवनमूल्यातून पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचे वस्तुपाठ समाजाला दिले आहेत. ज्याकाळी ‘पर्यावरण’ हा शब्द आजसारखा ‘फॅशनेबल’ नव्हता तेव्हापासून निसर्ग आणि मानवाच्या अतूट संबंधाबद्दल त्यांनी सर्वांशी संवाद साधायला सुरुवात केली किंबहुना पर्यावरणपूरक वास्तूंच्या संकल्पनाही त्यांनी पुढे आणल्या. कोकणातील नाधवडे येथे एक एकर जागेत त्यांनी उभारलेला प्रकल्प आणि त्यांनी स्वत:साठी अलीकडेच बांधलेले ‘लय’ हे घर पर्यावरणपूरक वास्तूचे आदर्श उदाहरण आहे. त्यांना आजवर देशातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचा पुरस्काराने गौरव होत आहे.
आॅलिव्हर गोएटझेल आणि इव्हो नॉरेनबर्ग दिग्दर्शित ‘दि जंगल बुक बेअर’ या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होईल. किर्लोस्कर आॅईल इंजिन्सचे डेप्युटी मॅनेजर (एचआर) राहुल पवार, वसुंधरा क्लबचे वीरेंद्र चित्राव, फिल्म सोसायटीचे सचिव दिलीप बापट आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Shirish Beri gets 'Vasundhara Samman'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.