कुलगुरु पदासाठी २५ नावे निश्चित : २६,२७ सप्टेंबरला मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 06:02 PM2020-09-12T18:02:06+5:302020-09-12T18:04:12+5:30
शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या निवड प्रक्रियेअंतर्गत मुलाखतीसाठी २५ उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यांच्या मुलाखती २६ आणि २७ सप्टेंबर रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहेत.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या निवड प्रक्रियेअंतर्गत मुलाखतीसाठी २५ उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यांच्या मुलाखती २६ आणि २७ सप्टेंबर रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहेत.
शोध समिती यामधून अंतिम पाचजणांची नावे निश्चित करून कुलपती कार्यालयाला सादर करील. त्या पाचजणांचे सादरीकरण व स्वतंत्र मुलाखती होतील. त्यातून कुलपती एकाची कुलगुरुपदी निवड करतील. डॉ. डी. टी. शिर्के, प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ, प्राचार्य डी. जी. कणसे, डॉ. व्ही. जे. फुलारी, आदी प्रमुख उमेदवारांचा त्यामध्ये समावेश आहे.
माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या कुलगुरुपदाचा कार्यकाल १७ जूनला संपला. कुलपती कार्यालयाने कुलगुरू निवड प्रक्रियेतर्गत इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई, औरंगाबाद, जळगाव अशा विविध शहरांतील शिक्षण संस्था, नामांकित विद्यापीठांतील प्रोफेसरांनी कुलगुरुपदासाठी अर्ज केले आहेत.
दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापकांनीही कुलगुरुपदासाठी अर्ज केले आहेत. तब्बल १६० हून अधिक अर्ज कुलपती कार्यालयाकडे जमा झाले होते. समितीकडून त्या अर्जांची छाननी करून पहिल्या टप्प्यातील मुलाखतीसाठी २५ जणांची यादी निश्चित केली आहे.