शिरोळमध्ये १९४२ अर्ज ठरले वैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:20 AM2021-01-02T04:20:14+5:302021-01-02T04:20:14+5:30
शिरोळ : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींसाठी दाखल झालेल्या १९६४ उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया गुरुवारी पार पडली. यामध्ये तेरा अर्ज ...
शिरोळ : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींसाठी दाखल झालेल्या १९६४ उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया गुरुवारी पार पडली. यामध्ये तेरा अर्ज अवैध, तर नऊ अर्ज दुबार ठरले. उदगाव व शिरढोणमध्ये प्रत्येकी एक जागा बिनविरोध होणार आहे. दरम्यान, १९४२ अर्ज शिल्लक राहिल्याने माघारीकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे.
मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात नऊ ठिकाणी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननीत सहभाग घेतला. निमशिरगाव, जांभळी, दत्तवाड या गावांतील अर्जांबाबत मोठ्या तक्रारी झाल्या. यासाठी कायदेशीर सल्लागारांना पाचारण करण्यात आले होते. अन्य गावात समझोता एक्स्प्रेस धावल्यामुळे खेळीमेळीत छाननी प्रक्रिया पार पडली. उदगाव (ता. शिरोळ) येथील सुनीता आदिनाथ चौगुले यांची ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झाली. प्रभाग क्रं. ५ मध्ये एकच अर्ज आल्याने त्यांची जागा बिनविरोध झाली, तर शिरढोण येथे अनुसूचित जमाती गटातून संभाजी कोळी बिनविरोध ठरले आहेत.