शिरोळ विधानसभा : राजकीय वातावरण तापू लागले
By admin | Published: July 24, 2014 11:32 PM2014-07-24T23:32:05+5:302014-07-24T23:39:10+5:30
मतदारसंघातून व्यूहरचना
संदीप बावचे - शिरोळ- शिरोळ विधानसभा मतदारसंघावर महायुतीतील स्वाभिमानी, शिवसेना, भाजपकडून स्वतंत्रपणे दावा केला जात आहे; तर राष्ट्रवादी पक्षानेही शिरोळ मतदारसंघातून व्यूहरचना आखली आहे. यातच विद्यमान आमदार डॉ. सा. रे. पाटील यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, असे असले तरी ‘दत्त’ कारखान्याच्या निवडणुकीनंतर आता तालुक्यातील विधानसभेचे राजकीय वातावरण तापू लागले आहे.
शिरोळ मतदारसंघ कॉँग्रेसचा बालेकिल्ला असून, यावेळी विद्यमान आमदार डॉ. सा. रे. पाटील हे निवडणूक लढविणार का, याबाबत सध्या तरी प्रश्नचिन्ह आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून राजकीय गणिते मांडली जात आहेत. शिरोळ विधानसभेसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे; तर विधानसभेची ही जागा भाजपला मिळावी, याबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक झाली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक असल्याचेही स्पष्ट केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनाही आपला हक्क या मतदारसंघावर सांगत असून, ‘स्वाभिमानी’कडून जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सावकर मादनाईक व पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष उल्हास पाटील या दोघांनीही आपली प्रचार यंत्रणा सुरू केली आहे. खासदार राजू शेट्टी हे कोणाला उमेदवारी देतात, यावरच बरेच काही अवलंबून आहे.
कॉँग्रेसकडून ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील हे वरिष्ठ पातळीवर उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्नात आहेत; तर राष्ट्रवादीने स्वबळाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ मतदारसंघातून शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर व विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांचे नाव उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे पाठविले आहे. जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने यांनीही नुकताच तालुक्यात दौरा करून चाचपणी केली आहे.
शिरोळ विधानसभा मतदारसंघात ऐन पावसाळ्यात राजकीय तर्क-वितर्कांचा महापूर आला असून, येणाऱ्या काही दिवसांत विधानसभेचा बिगुल वाजल्यानंतरच शिरोळमधील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.