शिरोळ बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:24 AM2021-05-06T04:24:07+5:302021-05-06T04:24:07+5:30
शिरोळ : अखेरची घटका मोजत असलेला शिरोळ-जुना कुरुंदवाड रस्ता मार्गावरील बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. दोन वर्षांपूर्वी बंधाऱ्याच्या ...
शिरोळ : अखेरची घटका मोजत असलेला शिरोळ-जुना कुरुंदवाड रस्ता मार्गावरील बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. दोन वर्षांपूर्वी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. बंधाऱ्याला पर्यायी बंधारा बांधता येईल का व अन्य तांत्रिक अडचणीमुळे दुरुस्तीचे काम रखडले होते. उशिरा का होईना प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
शिरोळ शहरापासून जुन्या कुरुंदवाड रस्त्यावर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पंचगंगा नदीवर बांधण्यात आला आहे. पूर्वी कुरुंदवाडला जवळचा रस्ता म्हणून त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. शिवाय, परिसरात शेती असल्याने या बंधाऱ्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. मात्र, गेली अनेक वर्षे बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे. कठडे तुटले आहेत. शिवाय हा बंधारा कमकुवत बनल्यामुळे दुरुस्तीसाठी दोन वर्षांपूर्वी सुमारे ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, जुन्या पद्धतीच्या या बंधाऱ्याला पर्यायी बंधारा उभारण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, त्याबाबत पुढे कार्यवाही झाली नसल्याने व हा बंधारा अखेरची घटका मोजत असल्याने दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. ज्या-ज्या ठिकाणी बंधारा खचला आहे, त्याचे मजबुतीकरण होणार आहे. पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
फोटो - ०५०५२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - शिरोळ-जुना कुरुंदवाड मार्गावरील बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे.