शिरोळ-दत्त, जवाहरला पुरस्कार प्रदान
By admin | Published: September 20, 2016 12:02 AM2016-09-20T00:02:05+5:302016-09-20T00:02:43+5:30
दिल्लीत सन्मान : गणपतराव पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे यांची उपस्थिती
शिरोळ/हुपरी : देशपातळीवरील उच्च साखर उतारा विभागात ऊस विकासाचा प्रथम पुरस्कार शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यास, तर २०१५-१६च्या गळीत हंगामामध्ये ऊस गाळप साध्य केलेल्या तांत्रिक, आर्थिक, ऊस विकास योजना व संशोधन, आदी क्षेत्रांतील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल हुपरी येथील जवाहर सहकारी साखर कारखान्यास केंद्र सरकारचे मुख्य संचालक जी. एस. साहू यांच्या हस्ते दिल्ली येथे सोमवारी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्री दत्त कारखान्याचा पुरस्कार अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी, तर जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
नॅशनल फेडरेशन आॅफ को-आॅप. शुगर फॅक्टरीज, दिल्ली या संस्थेच्या वार्षिक सभेत देशपातळीवरील हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, उपाध्यक्ष अमित कोरे, संचालक कल्लाप्पाण्णा आवाडे, मानसिंगभाई पटेल, जयंतीभाई पटेल, शिवाजीराव नागवडे, कार्यकारी संचालक मनोहर जोशी उपस्थित होते.
श्री दत्त कारखान्याने गळीत हंगाम २०१५-१६ मध्ये एकूण केलेल्या ऊस विकास, ऊस विकासाच्या अनुषंगाने कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांसाठी राबविलेल्या विविध ऊस विकास योजना, तसेच या योजना राबविल्यानंतर ऊस क्षेत्रामध्ये झालेली वाढ, उसाच्या टनेजमध्ये, तसेच रिकव्हरीमध्ये झालेली वाढ
या गोष्टी विचारात घेऊन हा उच्च साखर उतारा विभागातील ऊस विकासाचा पुरस्कार कारखान्यास देण्यात आला.
याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष सिदगोंडा पाटील, संचालक युसूफ मेस्त्री, अनिल यादव, श्रेणिक पाटील, शरदचंद्र पाठक, अरुणकुमार देसाई, रघुनाथ पाटील, विश्वनाथ माने, बसगोंडा पाटील, प्रमोद पाटील, आण्णासाहेब पवार, इंद्रजित पाटील, रणजित कदम, रावसाहेब नाईक, विजय सूर्यवंशी, बाळासाहेब पाटील, महेंद्र बागे, बाबूराव पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव उपस्थित होते.
जवाहर शेतकरी साखर कारखान्यास अनेक पुरस्कार
हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास देश पातळीवरील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री प्रकाश आवाडे, उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले व संचालक मंडळाला सन्मानित करण्यात आले.
जवाहर कारखान्यास यापूर्वी नॅशनल फेडरेशन आॅफ शुगर फॅक्टरीज नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघ मुंबई, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण पुणे अशा नामवंत संस्थांकडून तांत्रिक, आर्थिक, कृषी, पर्यावरण, वीज बचत, व्यवस्थापन आदी क्षेत्रांत उत्कृष्ट कामकाजाबाबत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे, अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी सर्व सभासद, संचालक, अधिकारी, कर्मचारी व ऊस तोडणी मजूर, कंत्राटदार, आदींचे आभार मानले.