शिरोळ ग्रामपंचायतीचे पाणी बचतीचे पुढचे पाऊल
By admin | Published: February 17, 2016 11:25 PM2016-02-17T23:25:11+5:302016-02-18T21:45:21+5:30
पावसाळ्यात पाण्याचे संवर्धन : प्रकल्पामुळे भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार
संदीप बावचे -- शिरोळ --बदलत्या हवामानानुसार पावसाचे प्रमाण व पाऊस पडण्याचा काळ यात बदल झाला आहे. यंदा दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे पाण्याचे नियोजन करणे आव्हान बनले आहे. यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात पाण्याचे संवर्धन करण्यासाठी शिरोळ ग्रामपंचायतीने पुढचे पाऊल टाकले आहे. ग्रामपंचायतीमार्फत रेन वॉटर हावेस्टिंग (पर्जन्य जल संवर्धन) हा प्रकल्प राबविला असून ग्रामपंचायतीच्या इमारतीवर हा प्रकल्प उभारून पाणी बचतीचा संकल्प केला आहे.
हवामानातील बदलामुळे पावसाचे प्रमाण व पाऊस पडण्याचा काळ कमी झाल्यामुळे भूजल पातळीत घट होत आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याबरोबरच त्याचा वापर करता यावा यासाठी ग्रामपंचायतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकल्प हाती घेतला आहे. ग्रामपंचायत इमारतीवर पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी रेन हार्वेस्टिंगचा पथदर्शी प्रकल्प उभारला आहे. इमारतीवर पडणारे पावसाचे पाणी एकत्र करण्यासाठी पीव्हीसी पाईपच्या सहायाने पाईप एकत्र जोडल्या आहेत.
पावसाच्या पाण्याबरोबर इमारतीच्या छतावरून माती, खडे, पाला-पाचोळा पाण्यापासून वेगळे करण्यासाठी आधुनिक पद्धतीचा रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी बनविलेला रेनी फिल्टर लावण्यात आला आहे. या फिल्टरमुळे कचरा आपोआप गुरुत्वाकर्षनाच्या सहायाने वेगळा होणार आहे. अगदी कमी जागेत स्वयंचलित हा फिल्टर असल्यामुळे मातीने व कचऱ्याने तो ब्लाक होत नसल्यामुळे खर्चाची बचत होणार आहे. असा प्रकल्प प्रत्येकाने राबविल्यास भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पाणीटंचाईवर मात करता येणार आहे.
भूजल पातळीत वाढ
वाढत्या शहरीकरणामुळे कॉँक्रीटीकरणात वाढ झाली आहे. यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून जाते. यामुळे भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली असून कूपनलिका व विहिरींची पाणी पातळी घटली आहे. यावर मात करण्यासाठी व पावसाचे पाणी जमिनीत मुरवून त्याचा वापर करण्यासाठी हा प्रकल्प उपयोगी पडणार आहे.
ग्रामपंचायतीनेच हा प्रकल्प बसविल्यामुळे असा उपक्रम राबविणारी राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. यापुढे बांधकाम परवाना घेणाऱ्यांना रेन हार्वेस्टिंग प्रकल्पाची सक्ती करण्यात येणार आहे. कूपनलिका व विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे.
- पृथ्वीराज यादव, उपसरपंच शिरोळ
स्वत:पासून सुरुवात
या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीने स्वत:पासून हा प्रकल्प राबविण्याचे धोरण निश्चित करून ग्रामपंचायत इमारतीजवळ असलेल्या विहिरीच्या पुनर्भरणासाठी त्याचा उपयोग केला जाणार आहे. सध्या या विहिरीत असलेला गाळ व दूषित पाणी बाहेर काढून टाकण्याचे काम सुरू आहे.