शिरोळ, हातकणंगले, कागलचा ‘पोत’ बिघडला : माती परीक्षण अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:19 AM2018-12-21T00:19:57+5:302018-12-21T00:22:51+5:30
भरघोस पिकासाठी मातीची सुपिकता वाढविण्याचे प्रयत्न करण्याऐवजी रासायनिक खते देण्याची प्रवृत्ती वाढल्याने पिकाऊ जमिनीचे आरोग्य झपाट्याने बिघडत चालले आहे. जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, कागल या तीन तालुक्यांतील बहुतांश जमीन सलाईनवर आहे. रासायनिक खतांशिवाय पीकच येत नाही, अशी
नसिम सनदी ।
कोल्हापूर : भरघोस पिकासाठी मातीची सुपिकता वाढविण्याचे प्रयत्न करण्याऐवजी रासायनिक खते देण्याची प्रवृत्ती वाढल्याने पिकाऊ जमिनीचे आरोग्य झपाट्याने बिघडत चालले आहे. जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, कागल या तीन तालुक्यांतील बहुतांश जमीन सलाईनवर आहे. रासायनिक खतांशिवाय पीकच येत नाही, अशी परिस्थिती आहे. शासनाच्या मृद सर्वेक्षण विभागाने केलेल्या माती परीक्षण अहवालातून हे वास्तव समोर आले आहे. या तीन तालुक्यांत आतापर्यंत २२ हजार ५९४ हेक्टर जमीन क्षारपड झाली असून, आणखी
२२ हजार १६९ हेक्टर जमीन क्षारपड होण्याच्या मार्गावर आहे.
राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी, वारणा या चार मोठ्या धरणांसह नऊ मध्यम प्रकल्प,५४ लघूप्रकल्प आणि बारमाही वाहणाऱ्या १४ नद्यांमुळे कोल्हापूर जिल्हा पाण्याच्या बाबतीत सुजलाम् सुफलाम् झाला आहे. या जोरावरच जिल्ह्यात आजच्या घडीला ४ लाख५ हजार हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. सिंचनाच्या मुबलक सुविधांमुळे बारमाही पिके घेण्याचे प्रमाण वाढले आहे. पाण्याबरोबर जिल्ह्यात समृद्धी आली असली तरी याच पाण्याच्या अतिवापराने जमिनीचे आरोग्य बिघडू लागले आहे. त्यातच अधिकाधिक उत्पन्न घेण्याच्या हव्यासामुळे मातीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून पिकांवर खतांचा मारा केला जात असल्याने जमिनीचा श्वासच कोंडू लागला आहे.
राज्य शासनाच्या कृषी विभागाने या संदर्भात सातत्याने इशारा देऊनही कोणतीही सुधारणा झालेली नाही. वर्षागणिक जमिनी खराब होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. अलीकडे क्षारपड जमीन सुधारणा मोहीम हाती घेतल्याने काही परिणाम दिसत असले तरी ज्या वेगाने जमिनी बिघडत चालल्या आहेत, त्या वेगाने त्यांचा पोत सुधारण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. चालू वर्षात १२२१ गावांतून ४९ हजार ३०० मातीचे नमुने घेतले. त्यात तांबे, जस्त, लोह, मँगेनीज ही सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी असल्याचा निष्कर्ष आला आहे. तसेच जमिनीत एनपीके अर्थात नत्र, स्फुरद व पालाशचे प्रमाण अतिभरपूर झाले असल्याचा धक्कादायक अहवाल आला आहे. विशेषत: कागल, शिरोळ, हातकणंगले या तालुक्यांत जमिनीची वाईट परिस्थिती आहे. शिरोळमध्ये स्फुरद व पालाश अतिप्रमाणात आहे.
मातीतील संतुलीत घटक
मृदेमध्ये ४५ टक्के रासायनिक पदार्थ, ५ टक्के सेंद्रिय पदार्थ, २५ टक्के पाणी व २५ टक्के हवा असते. जमिनीचा सामू सर्वसाधारणपणे ६.५ ते ७.५ यादरम्यान असल्यास पिकांसाठी आवश्यक सर्वच अन्नद्रव्ये घेणे शक्य होऊन उत्पादनात वाढ व सातत्य मिळते. मात्र, गेल्या काही वर्षांत सातत्याने झालेल्या चुकांमुळे मूलभूत घटकांचे असंतुलन झाले आहे.
हवा खेळती राहण्याचे प्रमाण कमी
‘एनपीके’चे प्रमाण वाढण्यास खतांचा व पाण्याचा अतिवापर हे प्रमुख कारण आहे. हे प्रमाण वाढल्याने जमिनी वेगाने क्षारपड अर्थात नापीक होत चालल्या आहेत. आजच्या घडीला कागल, शिरोळ, हातकणंगले या तीन तालुक्यांतील ४४ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावरील जमीन क्षारपडच्या फेºयात अडकली आहे. याशिवाय पिकांचा चुकीचा फेरपालट, तीच तीच पिके घेणे, जमिनीला विश्रांती न देणे, सेंद्रिय खतांचा वापर न करणे, आदी कारणांमुळेही जमिनीत हवा खेळती राहण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
नायट्रोजन वाढल्याने कीडरोग वाढले
नत्र अर्थात नायट्रोजनचे प्रमाण वाढल्याने जमिनी तर चोपण होत आहेत; शिवाय पिकांवर कीडरोगांचे प्रमाणही वाढले आहे. पिकांवर कवळकी दिसत असली तरी पानांना लुसलुशीतपणा आल्याने कीडरोगांचाही फैलाव वाढला आहे. मावा, तुडतुडे, रस शोषणाºया अळ्यांचे प्रमाण वाढल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
क्षारपड असलेली जमीन हेक्टरमध्ये
तालुका सलाईनवरील क्षेत्र आम्लधर्मीय क्षेत्र
शिरोळ ५५९५ ११७३०
हातकणंगले ११४३२ ९२६२
कागल ५१११ ११७७
पाणी व रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी होत चालला आहे. कृषी विभागाने शेडशाळ आणि कसबे डिग्रज या केंद्राबरोबरच साखर कारखान्यांच्या दहा खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून मातीपरीक्षण करून क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक शेतकºयाने जमीन चांगली, पिकाऊ राहावी म्हणून प्रयत्नांची गरज आहे. वारेमाप पाणी व खते वापरण्याची सवय बदलावी लागेल.
-मोहन लाटकर, मृदसर्वेक्षण अधिकारी