शिरोळला पाणी नियोजनाची गरज

By admin | Published: June 10, 2015 09:57 PM2015-06-10T21:57:40+5:302015-06-11T00:54:13+5:30

दिवसाआड पुरवठा : दैनंदिन मुबलक पाणी पुरवठ्याचे ग्रामपंचायतीसमोर आव्हान

Shirol needs water planning | शिरोळला पाणी नियोजनाची गरज

शिरोळला पाणी नियोजनाची गरज

Next

संदीप बावचे - शिरोळ--अनेक अडथळे पार करून पूर्णत्वास आलेल्या शिरोळच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे योग्य नियोजन ग्रामपंचायतीने करण्याची गरज निर्माण झाली आहे. पाण्याचा होणारा अपव्यव तसेच दैनंदिन पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याची गरज आहे. वाढती लोकसंख्या, भविष्यातील पाण्याचे नियोजन आतापासूनच केले तरच शिरोळकरांना पाणी-पाणी म्हणण्याची वेळ येणार नाही.
तालुक्याचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरोळची लोकसंख्या ४० हजारांच्या घरात पोहोचली आहे. वाढीव उपनगरांमुळे शहराचा विस्तारही वाढला आहे. पूर्वी पंचगंगा नदीवरून शिरोळची नळ
पाणीपुरवठा योजना सुरू होती. पंचगंगेच्या दूषित पाण्यापासून सुटका होण्यासाठी कृष्णा नदीवरून
पाणीपुरवठा योजना करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. श्रेयवादामुळे योजना पूर्णत्वास येणार की नाही, अशी परिस्थिती नव्या पाणीपुरवठा योजनेची बनली होती.
अखेर अनेक वर्षांनंतर कृष्णेचे पाणी शिरोळकरांना मिळाले. सध्या घालवाड येथील कृष्णा नदीवरून ही योजना अखंडपणे सुरू आहे. मात्र, सध्या एक दिवसाआडच ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीपुरवठा विभागाकडे पाण्याच्या तीन टाक्या आहेत. मात्र, गावचा विस्तार मोठा असल्यामुळे दररोज पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असला, तरी काही नळधारक पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात करीत आहेत. एकीकडे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी कसरत होत असताना दुसरीकडे पाणी विनाकारण वाया जात असल्याचे प्रकारही काही ठिकाणी घडत आहेत. यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. नागरिकांना पाण्याचे महत्त्व कळण्यासाठी नळाला मिटर बसविण्याची गरज आता बनू लागली आहे. भविष्यकाळात वाढलेला विस्तार व पाण्याची मागणी ही बाब गंभीर बनण्यापूर्वीच आणि दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत कसा ठेवता येईल, याचे नियोजन आतापासूनच करण्याची गरज आहे.


पेरी अर्बन योजना राबविणार
शिरोळचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भविष्यातील पाण्याची गरज ओळखून पेरी अर्बन योजनेतून माणसी सत्तर लिटर पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव लवकरच मंजूर होऊन पेरी अर्बन योजना राबविण्यासाठी आमचा प्रयत्न राहिल, अशी माहिती उपसरपंच पृथ्वीराज यादव यांनी दिली.
अकराशे रूपये पाणी २कर
शिरोळमध्ये नळधारकाला वार्षिक अकराशे रूपये पाणी पुरवठा कर आकारला जातो. शुद्ध व मुबलक पाणी देण्यासाठी नळ पाणीपुरवठा विभागाकडून प्रयत्न सुरू असले, तरी या विभागला मर्यादा येत आहेत. यामुळे सध्या एक दिवसाआडच पाणीपुरवठा होत आहे. पाणी करातून कर्मचाऱ्यांचा पगार आणि वीज बील याचे नियोजन चांगले झाले आहे.

Web Title: Shirol needs water planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.