शिरोळ तालुक्यात ४३२३ रुग्ण झाले कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:16 AM2021-06-11T04:16:35+5:302021-06-11T04:16:35+5:30
शिरोळ / जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात गेल्या सत्तर दिवसांत ४३२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या ८३१ रुग्ण उपचार ...
शिरोळ / जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात गेल्या सत्तर दिवसांत ४३२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या ८३१ रुग्ण उपचार घेत आहेत. जयसिंगपूर, शिरोळ, अब्दुललाट याठिकाणी दैनंदिन रुग्ण सापडत असले तरी अन्य गावात त्याचे प्रमाण अगदी कमी आहे. कोविड रुग्णालयात देखील रुग्णांची संख्या कमी होत आहे. नागरिकांनी कोरोना संपला म्हणून गाफील राहू नये. शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तालुक्यात कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या सकाळी सात ते सायंकाळी चारपर्यंत जीवनावश्यक सुविधा सुरू ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. असे असलेतरी नागरिक विनाकारण गर्दी करून कोरोनाला आमंत्रण देत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.
आतापर्यंत गेल्या सत्तर दिवसांत तालुक्यात ५ हजार २९८ पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले आहेत. त्यापैकी ४३२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ८३१ रुग्णांवर उपचार सुरू असून १४४ जणांचा मृत्यूदेखील झाला आहे. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण अधिक असलेतरी नागरिकांनी देखील शासनाच्या नियमांचे पालन केले पाहिजे. काही नागरिक कोरोना संपल्यासारखे विनामास्क फिरत असल्यामुळे कोरोनाला आमंत्रण देत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे.