कोल्हापुरात भाजप जिल्हाध्यक्षाविरोधात कार्यकर्त्यांचा वाद, ऐन निवडणुकीत वाद उफाळल्याने नेत्यांची डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 01:15 PM2024-10-21T13:15:27+5:302024-10-21T13:16:04+5:30
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना कार्यकर्त्यांचे निवेदन
कुरुंदवाड : भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर यांच्या विरोधात शिरोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांचा वाद पेटला आहे. विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी भाजपला लक्ष्य केले असताना जिल्हाध्यक्ष निंबाळकर यांच्या विरोधातील संघर्ष अधिक उफाळला आहे. जिल्हाध्यक्षासह तालुक्यातील कार्यकारिणी बरखास्त करावी अन्यथा पक्ष कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कार्यकर्त्यांनी दिल्याने संघर्ष पेटला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत पक्षातील वाद नेत्यांची डोकेदुखी ठरला आहे.
भाजपने जिल्हाध्यक्षपदी निंबाळकर यांची निवड केल्यापासून पक्षात विशेषत: शिरोळ तालुक्यात अंतर्गत वाद सुरू आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकीत पक्ष निधीचा खर्च व वाटपावरून निंबाळकर यांच्यावर कार्यकर्त्यांनी आरोप करून पक्षनेतृत्वाकडे लेखी तक्रारही केली आहे. विधानसभा निवडणुकीतही असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी दुखावलेल्या कार्यकर्त्यांनी निंबाळकर यांच्या विरोधातील वाद अधिक तीव्र केला आहे.
जिल्हाध्यक्षासह तालुक्यातील कार्यकारिणी बरखास्त करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. एखाद्या पदाधिकारीविरोधात लेखी तक्रार व उपोषणसारखे आंदोलनाचे शस्त्र पक्षात प्रथमच घडले आहे.
विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्ष सक्षम झाल्याने व भाजपलाच लक्ष्य केल्याने पक्षनेत्यांची तारांबळ उडाली आहे. त्यातच शिरोळ तालुक्यात पक्षांतर्गत वाद शिगेला पोहोचल्याने नेत्यांची डोकेदुखी झाली असून, कार्यकर्त्यांची मागणी मान्य होते की त्यांची समजूत काढून वाद मिटविला जातो, याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.