शिरोळ तालुक्यात वीटभट्टींची लगबग सुरू
By Admin | Published: December 17, 2015 12:51 AM2015-12-17T00:51:09+5:302015-12-17T01:17:55+5:30
हजारो कामगारांच्या हाताला रोजगार : उच्च प्रतींच्या विटांना राज्यासह कर्नाटकात मागणी
संतोष बामणे -- जयसिंगपूर -शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीटभट्टी व्यवसाय असून, यावर्षीचा वीटभट्टीचा हंगाम चार-पाच दिवसांपासून सुरू झाला आहे. राज्यासह कर्नाटकातून हजारोंच्या संख्येने वीटभट्टी कामगार दाखल झाले आहेत. तालुक्यातील विटा या उच्च प्रतीच्या असल्याने बांधकामक्षेत्रात या विटांचा नावलौकीक आहे. वीट निर्मितीसाठी नदीकाठावर कामगारांनी शिवार फुलला आहे. तालुक्यात कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्यांमुळे नदीकाठच्या मळीची माती चांगली असल्यामुळे या मातीला मोठी मागणी आहे. तालुक्यात चिंचवाड, उदगाव, अर्जुनवाड, कोथळी, उमळवाड, घालवाड, कनवाड, कुटवाड, शिरोळ, अकिवाट, राजापूर, हसूर, गणेशवाडीसह परिसरात तसेचदरवर्षी तीनशेहून अधिक वीटभट्ट्या तालुक्यात असून, ही वीट महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात बांधकामधारकांच्या पसंतीस पडली आहे. वीटभट्टी कामासाठी सांगली जिल्ह्यातील जत,कवठेमहांकाळ, कर्नाटकातील इंडी, विजापूर, अथणी, जमखंडी, बागलकोट, बनहट्टी, गुलबर्गा, बिदरसह परिसरातून मोठ्या प्रमाणात वीटभट्टीच्या कामासाठी कामगार उदरनिर्वाहासाठी शेकडो मैलावरून येथे येऊन रोजीरोटीचा प्रश्न दूर करतात. कामगारांना एक हजार वीट तयार केल्यानंतर सहाशे रूपये मिळतात. वीटभट्टी कामगारांना पहाटेपासून विटा थापाव्या लागतात. तसेच हे काम झाल्यानंतर विटांचे फड लावणे, त्यानंतर विटा तयार करण्यासाठी गारा तयार करणे या कामाला रात्रीचा दिवस करून आपल्या पोटाचा प्रश्न मिटवावा लागतो. गेल्या अनेक वर्षांपासून महापूर, अवकाळी पाऊस या नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत नुकसानीतून सावरत तालुक्यात वीट व्यावसायिकांची वाटचाल सुरू आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मातीउत्खननामुळे आवश्यक मळीच्या मातीचे क्षेत्र कमी झाल्याने सध्या मळीच्या मातीचा दर गगनाला भिडला असून, शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. येथील विटांना परजिल्ह्यांतून मोठी मागणी असून, सध्या वीट मालकांनाही विटांना दर चांगला मिळत आहे.
शिरोळ तालुक्यात अनेक वीटभट्टी व्यावसायिक असून, गेल्या चार दिवसांपासून वीटकामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक मजुरांच्या रोजी-रोटीचा प्रश्न सुटला आहे. दुष्काळग्रस्त भागातील हजारो मजूर येथे दाखल झाल्यामुळे नदीकाठ गजबजून गेला आहे.
- सुरगोंडा पाटील, वीटभट्टी उत्पादक, उदगाव.
सोलापूर जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे आमची शेती असूनही गेल्या दहा वर्षांपासून शिरोळ तालुक्यात वीट तयार करण्यासाठी आम्ही सहकुटुंब येतो. येथे आठ महिने विटांच्या कामात मोलमजुरी करतो. यावरच आमच्या संसाराचा गाडा चालवितो.
- रमेश कलकुटगी,
वीट मजूर, परंडा.