शिरोळ तालुक्याची ‘जीवनदायिनी’ धोक्यात

By admin | Published: December 28, 2015 12:10 AM2015-12-28T00:10:26+5:302015-12-28T00:24:16+5:30

बावीस गावांना वरदान : पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळेच बंधाऱ्याची दुरवस्था; गळती कायम

Shirol taluka's 'life partner' threat | शिरोळ तालुक्याची ‘जीवनदायिनी’ धोक्यात

शिरोळ तालुक्याची ‘जीवनदायिनी’ धोक्यात

Next

संदीप बावचे - शिरोळ तालुक्यातील नागरिकांना ‘जीवनदायी’ ठरलेला आणि शेतकऱ्यांना ‘वरदान’ असलेला राजापूर बंधारा कमकुवत बनल्यामुळे तो अखेरची घटका मोजत आहे. बंधाऱ्याच्या तळपातळीखालील दगड निघून गेले आहेत. बरगे घालूनही गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पाणी गळतीचा फायदा कर्नाटक राज्याला होत आहे. कमकुवत झालेला हा बंधारा ढासळला तर तालुक्यातील २२ गावांचा पाणीप्रश्न गंभीर बनणार आहे. वेळीच या बंधाऱ्याकडे लक्ष न दिल्यास तालुक्यावर पाणी-पाणी म्हणण्याची वेळ येणार आहे.
कृष्णा नदीवर बांधण्यात आलेला राजापूर येथील बंधारा तालुक्यातील नागरिकांना जीवनदायी म्हणून ओळखला जातो. १९८० ला
हा बंधारा बांधण्यात आला. उन्हाळ्यात पाणी आडवून राजापूरसह मजरेवाडी, कुरुंदवाड, अकिवाट, नृसिंंहवाडी, औरवाड, गौरवाड, गणेशवाडी, कवठेगुलंद, शेडशाळ, आलास, बुबनाळ, बस्तवाड, शिरोळ, कनवाड, कुटवाड, घालवाड, शिरटी, धरणगुत्ती, आगर, हसूर, राजापूरवाडी आदी २२ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरावा यासाठी राजापूर बंधारा बांधण्यात आला. या २२ गावांबरोबरच इचलकरंजी शहरालाही पाणीपुरवठा याच कृष्णेच्या पात्रातून होतो. गेल्या ३५ वर्षांपासून बंधाऱ्याच्या बॅकवॉटरचे पाणी नागरिकांना जीवनदायी, तर शेतकऱ्यांना वरदान ठरले आहे.
कृष्णेच्या पाण्यावर असलेली शेती सुजलाम्, सुफलाम् बनल्याने तालुक्याचा विकास झाला आहे. राजापूर बंधारा हा आता कमकुवत बनला आहे. एकूण ६५ गाळे या बंधाऱ्यावर असून बंधाऱ्याच्या तळपातळीखालील दगड पाण्याच्या प्रवाहामुळे निखळून गेले आहेत. बहुतांश गाळ्यांतील दगड निघून गेले आहेत. २००५ ला आलेल्या महापुरात झाडाचे मोठमोठे बुंधे बंधाऱ्याला येऊन तटल्यामुळे बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे. बंधाऱ्यावर बरगे घातले तरी गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई असताना गळतीमुळे पाणी वाया जाते. बंधारा दुरुस्त करावयाचा झाल्यास एक वर्ष बरगे घालता येणार नाहीत. बंधाऱ्याची दुरुस्ती जरी झाली तरी ३५ वर्षे पूर्ण झालेला बंधारा कितपत टिकणार हा प्रश्नही उपस्थित होत आहे. कमकुवत बनत चाललेला राजापूर बंधारा एक-दोन वर्षांत ढासळला तर येथे बंधारा होता असे म्हणण्याची वेळ येऊ नये.


शिरोळ तालुक्यातील २२ हून अधिक गावांना वरदान ठरलेला राजापूर बंधारा दुर्लक्षित झाला आहे. शेती व पिण्याच्या पाण्याची तहान भागविणारा हा बंधारा अखेरची घटका मोजत आहे. ‘नेमिची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे लोकप्रतिनिधींकडून आश्वासने मिळतात, तर सांगली पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेला हा बंधारा कोल्हापूर जिल्ह्यात असल्यामुळे पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळेच बंधाऱ्याची ही अवस्था बनली आहे. याचा वेध घेणारी ‘राजापूर बंधाऱ्याला अवकळा’ ही मालिका आजपासून...


कर्नाटककडून बंधारा टार्गेट?
शिरोळ तालुक्यातील गावांना या धरणातून बॅकवॉटरचे पाणी मिळते. सन २००३ ला उन्हाळ्यात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. धरणात पुरेसे पाणी नसल्याने कर्नाटकाकडे पाणीपुरवठा केला गेला नव्हता. याचा राग मनात धरून कर्नाटकातील शेतकऱ्यांनी रात्रीत धरणावर हल्ला करून बरगे काढून धरण फोडण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा बोध घेता आणि यंदा पाऊस कमी झाल्याने व दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने पाणी समस्या निर्माण होण्यापूर्वी पाटबंधारे विभागाने दखल न घेतल्यास बंधाऱ्याचे पाणी पुन्हा पेटण्यास वेळ लागणार नाही.

Web Title: Shirol taluka's 'life partner' threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.