शिरोळ तालुका राज्यात आदर्शवत करणार : राजेंद्र पाटील-यड्रावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 11:50 PM2019-10-18T23:50:57+5:302019-10-18T23:54:45+5:30

तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते; मात्र शेतीमाल उद्योग सुरू होणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांचे अभ्यासकेंद्र व उदयोन्मुख खेळांडूसाठी क्रीडासंकुल उभारणे गरजेचे आहे.

Shirola taluka to be ideal in the state: Rajendra Patil-Yadravkar | शिरोळ तालुका राज्यात आदर्शवत करणार : राजेंद्र पाटील-यड्रावकर

शिरोळ तालुका राज्यात आदर्शवत करणार : राजेंद्र पाटील-यड्रावकर

Next
ठळक मुद्देरोखठोक राजेंद्र पाटील-यड्रावकर तरुण, महिलांच्या हाताला काम देणार; शेती, आरोग्य, शिक्षण, उद्योग, पायाभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावणार

संदीप बावचे ।

जयसिंगपूर : गेल्या पाच वर्षांत तालुक्यात विकासाच्या गप्पा झाल्या. आमदार फंडातून झालेले रस्ते व गटारी म्हणजे विकास नव्हे. तालुक्याचा रचनात्मक व सर्वसमावेशक विकास होणे गरजेचे आहे. तालुक्यात रोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. त्याबाबत कोणतेही काम केलेले दिसत नाही. महिला स्वयंरोजगार याविषयी कोणतीही भूमिका घेतली नाही. तालुक्यातील शेकडो एकर शेती क्षारपडमुळे नापीक झाली आहे, त्याच्यावर कोणत्याच उपाययोजनेचे प्रयत्न झाले नाहीत. शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर होत चालला आहे. तालुक्याला मल्टिपर्पज हॉस्पिटल आवश्यक असून, मोफत औषधोपचार मिळणे गरजेचे आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते; मात्र शेतीमाल उद्योग सुरू होणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांचे अभ्यासकेंद्र व उदयोन्मुख खेळांडूसाठी क्रीडासंकुल उभारणे गरजेचे आहे. महापुराने तर तालुक्याला उद्ध्वस्त केले आहे. त्यावेळी तर सरकार अपयशी ठरले आहे. लोकप्रतिनिधींना प्रशासनाला हाताळता आले नाही. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच काही लोक कोणत्याही विकासकामांची चर्चा न करता चळवळीच्या नावावर, तर काही जातीपातीच्या नावावर मते मागत आहेत. विकासकामांवर कोण बोलणार आहे का नाही?

गेल्या ४० वर्षांपासून यड्रावकर कुटुंबीय सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम करीत आहे. त्याच्या जोरावार आज पक्षाने डावलल्यावरही तालुक्यातील जनता पाठीशी राहिली आहे. कोणावरही टीका-टिप्पणी न करता गत निवडणुकीच्या अपयशाच्या चौथ्या दिवसांपासून मी कामास सुरुवात केली आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात संपर्क ठेवून जनतेस २४ तास उपलब्ध राहिलो आहे.

तालुक्यातील प्रत्येक अडचणीत मी त्यांच्यासोबत राहून अधिकाधिक सहकार्य करण्यात पुढाकार घेतला आहे. ती सर्व जनता आज माझ्या सोबत आहे. त्यामुळेच तर मला अपक्ष लढण्याचे बळ मिळाले आहे.
राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फौंडेशनच्या माध्यमातून ६७५ रुग्णांवरती लाखो रुपये खर्चाच्या शस्त्रक्रिया व औषधोपचार, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, सामुदायिक विवाह सोहळा, अपंग, कर्णबधिर व मूकबधिरांसाठी मदत, दुष्काळग्रस्त बांधवांना मदतीचा हात, सेवाभावी संस्था, तरुण मंडळे, गरीब-गरजू यांना नेहमी मदतीचा हात, पाणी फौंडेशनच्या कामाला श्रमदानातून बळ देण्याचे काम, तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी भव्य रोजगार मेळावा घेऊन रोजगार उपलब्ध करून दिले आहेत.सहकारी साखर कारखाना, सूतगिरणी, शिक्षण संस्था, बँक, औद्योगिक वसाहत यांच्या माध्यमातून हजारोंच्या हाताला काम, सोशल फौंडेशनातून आरोग्याची मदत करीत आहे. महापुराच्या काळात मदतीचा प्रयत्न केला आहे.

 

कोणावरही टीका करून मी निवडणूक लढवित नाही. तालुक्यातील विविध प्रश्न आणि त्याबद्दल मी काय करणार एवढेच मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहे. मी केलेल्या कामाचा आढावा घेण्यासोबत भविष्यात तालुक्यातील जनतेला सोबत घेऊन राज्यातील आदर्श तालुका करण्याचा माझा मानस आहे. तरुण, महिला बेरोजगार, शिक्षण, शेती, आरोग्य क्षारपड जमीन, महापूर असे अनेक प्रश्न तालुक्या-समोर आहेत. ते सोडविण्यावर भर देणार आहे, असे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

महापुरात पूरग्रस्तांना मदतीचा हात
महापूर काळात शरद कॉलेजच्या ३९ बसेसच्या माध्यमातून हजारो पूरग्रस्त बांधवांना सुरक्षितस्थळी पोहोचविले. जनावरांना चारा, निवारा छावणी, जनावरांसाठी निवाऱ्याची सोय. गावागावांत पिण्याच्या पाण्याची सोय. फौंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा, घरगुती वीज उपकरणे टीमकडून दुरुस्ती, जीवनावश्क वस्तूंची मदत, सर्व गावांमध्ये औषध फवारणी करून मदत केली. शेतकऱ्यांसाठी शरद कारखाना व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून ४०० एकर जमिनीवर क्षारपड मुक्तीसाठी पायलट प्रकल्प, शेती परिसंवाद, मार्गदर्शन शिबिर, प्रशिक्षण कार्यशाळा असे अनेक मुद्दे घेऊन मी मतदारांसमोर जात आहे.

हक्काचा माणूस
गेली अनेक वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात यड्रावकर कुटुंब कार्यरत आहे. पक्ष, गट-तट, जात-धर्म न पाहता येईल त्याचे काम करण्याचा हातखंडा असल्याने तालुक्यात हक्काचा माणूस म्हणून माझी ओळख निर्माण झाली आहे.
 

तालुक्याचा विकासात्मक व रचनात्मक आराखडा करून विकास करण्याचा भर माझा राहणार आहे. तालुक्यातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठीच माझा प्रयत्न राहील. तसेच मतदारसंघातून प्रचारात मिळत असलेला प्रतिसाद पाहता जनता माझ्याबरोबर राहील, असा विश्वास यड्रावकर यांनी व्यक्त केला.

Web Title: Shirola taluka to be ideal in the state: Rajendra Patil-Yadravkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.