शिरोळला त्रिशंकू अवस्था
By Admin | Published: February 24, 2017 12:06 AM2017-02-24T00:06:14+5:302017-02-24T00:06:14+5:30
भाजपची मुसंडी : स्वाभिमानी संघटनेच्या बालेकिल्ल्याला हादरे
शिरोळ : शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सातपैकी तीन जागा जिंकून भाजपने जोरदार मुसंडी मारली. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी पीछेहाट झाली, तर पंचायत समितीवर कोणत्याही पक्षाला बहुमत सिद्ध करता आले नाही. पंचायत समितीच्या चौदापैकी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सहा, स्वाभिमानी चार, शिवसेना दोन, भाजप व अपक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली. तथापि, पंचायत समितीत सत्तेचा खेळ आता आकड्यांच्या गणितात अडकला आहे.
कमालीच्या उत्सुकतेत गुरुवारी येथील पंचायत समिती सभागृहात मतमोजणी झाली़ दानोळी जिल्हा परिषदेचा पहिल्या निकालामध्ये दानोळी जिल्हा परिषद व पंचायत समितीसह कोथळी पंचायत समितीच्या माध्यमातून स्वाभिमानीने विजयी सलामी दिली. भाजपने शिरोळ, अब्दुललाट व नांदणी या जिल्हा परिषदेच्या तीन जागा जिंकून स्वाभिमानीला धक्का दिला. काँग्रेसने दत्तवाड, राष्ट्रवादीने आलास, तर शिवसेनेने उदगाव जिल्हा परिषदेची जागा जिंकली.
पंचायत समितीच्या दानोळी, कोथळी, अकिवाट, उदगाव या चार जागेवर स्वाभिमानी, आलास, नांदणी, टाकळी हे राष्ट्रवादीला, गणेशवाडी, शिरढोण, दत्तवाड काँग्रेसला, अर्जुनवाड, यड्राव शिवसेनेस, तर शिरोळ भाजप व अब्दुललाटची जागा अपक्षाला मिळाली. दरम्यान, नांदणी जिल्हा परिषद मतमोजणीवेळी भाजपचे राजवर्धन नाईक-निंबाळकर हे तीन मतांनी निवडून आले. काँग्रेसच्या फेरमतमोजणीच्या मागणीनंतर नाईक-निंबाळकर हे सहा मतांनी निवडून आल्याचे घोषित केले.
निकालाबाबत समर्थकांत उत्कंठा लागून राहिली होती़ जसजसे निकाल जाहीर होतील तसे विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व आतषबाजीसह जल्लोष केला़
प्रमुख पराभूत
दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघातून पंचायत समितीच्या माजी सभापती सुजाता शिंदे ६२२ मतांनी पराभूत झाल्या. या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या बेबीताई भिलवडे यांनाही पराभव पत्करावा लागला. अकिवाट पंचायत समिती मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य इकबाल बैरगदार, नांदणी पंचायत समिती मतदारसंघातून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या नीता परीट हे देखील पराभूत झाले.
मताधिक्य, कमी मतांनी विजय
अब्दुललाट जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे विजय भोजे ४६४९ मताधिक्याने, तर नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे राजवर्धन नाईक-निंबाळकर सहा मतांनी विजयी झाले. दानोळी पंचायत समिती मतदारसंघातून स्वाभिमानीचे सुरेश कांबळे २८३३ मताधिक्याने, तर उदगाव पंचायत समिती गणातून स्वाभिमानीचे मन्सूर मुल्लाणी १०२ मतांनी विजयी झाले.
भाजपची ताकद वाढली
शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अनिल यादव यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सातपैकी तीन जागा जिंकून आपली ताकद दाखवून दिली आहे. तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादीसह स्वाभिमानीला आत्मपरीक्षण करायला लावणारा हा निकाल ठरला, तर शिवसेनेने जिल्हा परिषद निवडणुकीत आपले खाते उघडले.