शिरोली, नागावला हद्दवाढ प्रस्तावातून वगळणार
By Admin | Published: July 24, 2014 12:25 AM2014-07-24T00:25:56+5:302014-07-24T00:30:05+5:30
मुख्यमंत्र्यांची ग्वाही : शिष्टमंडळ भेटले
शिरोली : कोल्हापूर महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीतून शिरोली व नागावला वगळण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले असल्याची माहिती माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी दिली.
आज, बुधवारी मुंबईत खासदार आवळे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही दोन गावे शहरापासून वेगळी आहेत. शहरात या गावांचा समावेश झाल्यावर गावांचे अस्तित्वच राहणार नाही. तसेच शिरोली औद्योगिक वसाहत ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत आहे. हद्दवाढीमुळे उद्योगांना एलबीटी तर लागणारच; पण त्याचबरोबर इतरही निरनिराळे १२ कर लागणार आहेत. म्हणूनच ही गावे हद्दवाढीतून वगळावीत, असे लेखी पत्र द्या, अशी मागणी मुंबईतील बैठकीत केली. त्यावर मुख्यमंत्री चव्हाण यांनी शिरोली व नागाव या दोन गावांना हद्दवाढ प्रस्तावातून वगळण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात शशिकांत खवरे, सलीम महात, जोतिराम पोर्लेकर, प्रकाश कौंदाडे, शिवाजी खवरे, डॉ. सुभाष पाटील, बाजीराव सातपुते, उत्तम पाटील, सरदार मुल्ला, शिवाजी कोरवी, शिवाजी समुद्रे, लियाकत गोलंदाज, नागावचे उपसरपंच राजू यादव, दीपक लंबे, आदींचा समावेश होता.