निर्यातीसाठी शिरोली एमआयडीसीतील उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:24 AM2021-01-03T04:24:08+5:302021-01-03T04:24:08+5:30
शिरोली : निर्यातीसाठी शिरोली औद्योगिक वसाहतीमधील (एमआयडीसी) उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे यांनी केले. शिरोली ...
शिरोली : निर्यातीसाठी शिरोली औद्योगिक वसाहतीमधील (एमआयडीसी) उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे यांनी केले.
शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या (स्मॅक) भवन येथे मोहनराव शिरगावकर सभागृहातील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी ‘स्मॅक’चे अतुल पाटील होते.
माझ्या परिचयातील विविध देशांच्या राजदूतांच्या माध्यमातून शिरोली एमआयडीसीमध्ये उत्पादन केलेल्या मालाच्या निर्यातीसाठी प्रयत्न करणार आहे. संबंधितांचे संपर्क क्रमांक ‘स्मॅक’ला देणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमात प्रारंभी अतुल पाटील यांनी खासदार संभाजीराजे यांचे पुष्पगुच्छ, शाल देऊन स्वागत केले. तसेच उद्योजकांचे केंद्र स्तरावरील प्रश्न सांगितले. ईएससीआयच्या माध्यमातून सेवा दवाखाना मंजूर झालेला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव ‘स्मॅक’ने दाखल केला आहे. याविषयी केंद्रात पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात आली. खासदार संभाजीराजे यांनी त्यांच्या फंडातून दोन अत्याधुनिक रुग्णवाहिका मंजूर केल्या आहेत. त्यामध्ये काही महत्वाच्या जीवनावश्यक यंत्रसामुग्री बसविण्याकरिता सर्व औद्योगिक संघटनांनी योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने ‘स्मॅक’कडून दोन लाख रूपयांच्या मदतीचा धनादेश अतुल पाटील यांनी खासदार संभाजीराजे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी ‘स्मॅक’चे सचिव जयदीप चौगले, खजिनदार एम. वाय. पाटील, आयटीआयचे अध्यक्ष राजू पाटील, कोल्हापूर फौंड्री क्लस्टरचे अध्यक्ष सचिन पाटील, संचालक प्रशांत शेळके, सोहम शिरगावकर, राजेंद्र वारनूळकर, रवी डोली, मिलिंद पाटील उपस्थित होते. उपाध्यक्ष दीपक पाटील यांनी आभार मानले.
फोटो (०१०१२०२१-कोल-स्मॅक फोटो) : रूग्णवाहिकांमध्ये जीवनावश्यक यंत्रसामुग्री बसविण्यासाठी ‘स्मॅक’कडून अध्यक्ष अतुल पाटील यांनी खासदार संभाजीराजे यांच्याकडे दोन लाख रूपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी जयदीप चौगले, एम. वाय. पाटील, राजू पाटील, सचिन पाटील, आदी उपस्थित होते.