शिरोली दुमाला शाखेत आणखी बनावट सोने, बँकेला पत्रव्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 06:27 PM2018-10-15T18:27:05+5:302018-10-15T18:29:15+5:30
बनावट सोनेतारण कर्जप्रकरणात संशयितांनी सुमारे १२ बँकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे स्पष्ट झाले आहे. अजूनही केडीसीसी बँकेच्या शिरोली दुमाला शाखेत बनावट सोनेतारण ठेवले आहे. पोलिसांनी बँकेला पत्रव्यवहार करून माहिती कळवली आहे. राजे विक्रमसिंह घाटगे कागल को-आॅपरेटिव्ह बँकेने अद्याप पोलिसांच्या ताब्यात दागिने दिलेले नाहीत, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
कोल्हापूर : बनावट सोनेतारण कर्जप्रकरणात संशयितांनी सुमारे १२ बँकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे स्पष्ट झाले आहे. अजूनही केडीसीसी बँकेच्या शिरोली दुमाला शाखेत बनावट सोनेतारण ठेवले आहे. पोलिसांनी बँकेला पत्रव्यवहार करून माहिती कळवली आहे. राजे विक्रमसिंह घाटगे कागल को-आॅपरेटिव्ह बँकेने अद्याप पोलिसांच्या ताब्यात दागिने दिलेले नाहीत, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
आयसीआयसीआय बँक, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (केडीसीसी), वीरशैव सहकारी बँक, राजे विक्रमसिंह घाटगे कागल को-आॅपरेटिव्ह बँक आणि एक पतसंस्था व तीन सराफांकडे दोन किलो ९१ ग्रॅम बनावट सोनेतारण ठेवून तब्बल ३९ लाख ३२ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या १0 जणांच्या टोळीचा छडा करवीर पोलिसांनी लावला आहे.
मुख्य सूत्रधार चंद्रकांत शिवराम भिंगार्डे, अतुल निवृत्ती माने, विलास अर्जुन यादव, विक्रम मधुकर कोईगडे, अमर दिनकर पाटील, भारती श्रीकांत जाधव, राकेश रजनीकांत रणदिवे, पृथ्वीराज प्रकाश गवळी, कविता आनंदराव राक्षे यांना अटक केली आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज, मंगळवारी संपत आहे.
अद्याप या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आनंदराव राक्षे, (रा. कोरेगाव-सातारा), तानाजी केरबा माने (रा. गणेशवाडी ता. करवीर) आणि व्यापारी असे तिघेजण पसार आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत; त्यामुळे संशयितांना वाढीव पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी न्यायालयात केली जाणार आहे.
झटपट पैसा मिळवणे हाच उद्देश
आनंदराव राक्षे व कविताकडून ११ हजार रुपये तोळा या दराने मुख्य सूत्रधार चंद्रकांत भिंगार्डे हा बनावट सोने विकत घेऊन तो इतरांना १३ हजार रुपयांना विकत असे. हेच सोने बँकेत तारण ठेवून त्यावर १८ ते २० हजार रुपये कर्ज उचलायचे. त्यानंतर ते पैसे भिंगार्डे व कर्जदार वाटून घ्यायचे. पैसा मिळवणे हाच मुख्य उद्देश संशयितांचा होता, असे पोलीस तपासात पुढे आले आहे.
तो व्यापारी कोण?
भिंगार्डेच्या आॅर्डरप्रमाणे आनंदराव राक्षे हा एका व्यापाºयाकडून कुरिअरने बनावट सोने मागवून घेत असे. काहीवेळा भिंगार्डेही थेट व्यापाऱ्यांकडून सोने कुरिअरने मागवून घेत होता. त्याचा मोबाईल नंबर भिंगार्डेकडे आहे. बनावट सोन्यांची विक्री करणारा व्यापारी कोण? याचा शोध पोलीस घेत आहेत. हा व्यापारी मिळाल्यानंतर आणखी किती बँकांची फसवणूक झाली आहे, हे स्पष्ट होणार आहे.