हद्दवाढ विरोधात शिरोली बेमुदत बंद
By Admin | Published: February 17, 2016 11:53 PM2016-02-17T23:53:57+5:302016-02-18T21:15:48+5:30
सर्वपक्षीय बैठक : स्वतंत्र नगरपालिकेस मंजुरी देण्याची मागणी
शिरोली : कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीतून शिरोलीचे नाव वगळावे, स्वतंत्र नगरपालिकेस मंजुरी द्यावी या मागणीसाठी शुक्रवार (दि. १९)पासून शिरोली बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंबंधी बुधवारी ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चव्हाण म्हणाले, महापालिकेच्या हद्दवाढीचा सुधारित प्रस्ताव जिल्हा अधिकारी अमित सैनी यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शिफारशीने राज्य शासनाकडे पाठविला आहे; पण हद्दवाढीत समावेश करणाऱ्या १९ गावांचे म्हणणेही जाणून घ्यायला पाहिजे होते. एकतर्फी महापालिकेच्या बाजूने हा प्रस्ताव पाठविला आहे. आमच्या गावांचा स्वतंत्र नगरपालिकेचा प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रालयात आहे. आम्हाला नगरपालिका पाहिजे, त्यासाठीच जोपर्यंत हद्दवाढीतून गावाचे नाव काढले जात नाही, तोपर्यंत शिरोली गावातील सर्व व्यवहार बेमुदत बंद राहतील.
तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतीश पाटील म्हणाले, खासदार राजू शेट्टी, आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि आमदार अमल महाडिक यांना कोणीही भेटायला जायचे नाही, या नेतेमंडळींनी आजपर्यंत शिरोलीकरांना फक्त पोकळ आश्वासने दिली आहेत, त्यांनी नगरपालिका मंजूर करायला हवी होती; पण सर्व नेत्यांनी शिरोलीकरांना फसविले आहे.
ग्रामपंचायत सदस्य गोविंद घाटगे म्हणाले, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हद्दवाढ हाणून पाडूया. यावेळी उपसरपंच राजू चौगुले, पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल खवरे, बबन संकपाळ, शिवसेना तालुका अध्यक्ष बाजीराव पाटील, सलिम महात, सुरेश यादव, लियाकत गोलंदाज, विजय जाधव, शिवाजी खवरे, शिवाजी कोरवी, हरी पुजारी, बापू पुजारी, रणजित केळुसकर, राजेश पाटील, हिम्मत सर्जेखान, मधुकर पदमाई , अविनाश जाधव, काँग्रेसचे बाजीराव सातपुते, अनिल कोळी, रामचंद्र बुडकर, अशोक स्वामी, मुकुंद नाळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
सोमवारी जनावरांसह महामार्ग रोखणार
शिरोली येथे प्रत्येक शनिवारी भरणारा आठवडी बाजार या शनिवारी भरणार नाही. तसेच गावातील सर्व व्यवहार बेमुदत बंद राहतील. या बंदमध्ये सर्वांनी सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे उपसरपंच राजू चौगुले म्हणाले. सोमवारी (दि.२२) गावातील नागरिक सहकुटुंब आणि जनावरांसह पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा निर्णय बैठकीत झाला.