शिरोळकरांना नगरपालिकेची प्रतीक्षा

By admin | Published: August 19, 2016 11:01 PM2016-08-19T23:01:11+5:302016-08-20T00:18:16+5:30

कधी घोषणा होणार : जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या आरक्षणाची संभ्रमावस्था

Shirolkar is waiting for the municipality | शिरोळकरांना नगरपालिकेची प्रतीक्षा

शिरोळकरांना नगरपालिकेची प्रतीक्षा

Next

संदीप बावचे--शिरोळ --गेल्या दोन वर्षांपासून नगरपालिका होणार या चर्चेतच शिरोळ ग्रामपंचायत आहे. सध्या तोंडावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे काहींचे लक्ष नगरपालिका होणार याकडे लागले आहे, तर काहींचे जिल्हा परिषदेच्या आरक्षणाकडे लागले आहे. इतर जिल्ह्यांत तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायती व नगरपरिषदा स्थापन झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरक्षणाकडे लक्ष असणाऱ्यांची संभ्रमावस्था शिरोळ शहरात बनली आहे.
शिरोळ ४० हजारांहून अधिक लोकसंख्येचे शहर असून, येथे नगरपरिषद स्थापन होऊन सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने शासनाने तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायत व लोकसंख्येच्या मानाने नगरपालिका हा आदेश काढला होता. इतर जिल्ह्यांत या आदेशाचे पालन झाले. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात हा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे शिरोळ शहराचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
तहसील कार्यालयाकडे अभिप्रायाअभावी नगरपरिषदेबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पडून राहिला आहे. हुपरीवासीयांनी रेटा लावून शासनाकडून नगरपरिषद मंजूर करून घेतली. यामुळे आता शिरोळला नगरपरिषद होणार का? हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. मार्च २०१४ मध्ये आघाडी शासनाने राज्यातील १३८ गावांना नगरपरिषद व नगरपंचायती मंजूर केल्याचे आदेश जारी केले होते. नगरपरिषदेबाबतचा प्राथमिक प्रस्ताव मंत्रालयात पाठविला होता. शासनाच्या लालफितीत अडकलेला नगरपरिषदेबाबतचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ६ एप्रिल २०१५ रोजी महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्रात उद्घोषणा प्रसिद्ध झाली होती.
दरम्यान, ग्रामपंचायतऐवजी नगरपालिका करण्याची उद्घोषणा झाल्यानंतर त्यावर आक्षेप सादर करण्यासाठी ५ मे २०१५ पर्यंत मुदत ठेवण्यात आली होती. मुदती अखेर हरकती दाखल झाल्या. या हरकतीचा अहवाल तसेच शिरोळ तहसीलदारांचा अभिप्राय, गट नंबर, एकूण क्षेत्र, नकाशा याबाबतचा अहवालही तयार करून शासनाकडे पाठविण्याबाबत सूचना होत्या. शिरोळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महसूल यंत्रणा अडकल्याने अभिप्रायचा अहवाल अद्याप पाठविण्यात आलेला नाही. हा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंतिम प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्यानंतरच दुसरी अधिसूचना निघून राजपत्रात अधिकृत नोंद झाल्यानंतरच नगरपरिषद अस्तित्वात येणार आहे.


ग्रामपंचायतीऐवजी नगरपालिका
शिरोळ येथे ग्रामपंचायतीऐवजी नगरपालिका स्थापनेची चर्चा सुरू आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिरोळ मतदारसंघावर नगरपालिका स्थापनेचे सावट आहे.
परिणामी जिल्हा परिषद निवडणुकीबाबत संभ्रमावस्था आहे. नगरपालिका झाल्यास मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे. तसे न झाल्यास आरक्षणही बदलणार आहे.


नगरपालिका गरजेची
शिरोळ हे तालुक्याचे ठिकाण असून लोकसंख्या ४५ हजाराच्या घरात पोहचली आहे.
परिपूर्ण नागरी सुविधा देण्याबाबत ग्रामपंचायतीला मर्यादा येत आहेत.
नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर शासनाचा मोठा निधी विकासकामांसाठी मिळू शकतो. यामुळे नगरपरिषद होणे गरजेचे आहे.

Web Title: Shirolkar is waiting for the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.