शिरोळचा दुय्यम निबंधक लाचलुचपतच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:17 AM2021-06-23T04:17:16+5:302021-06-23T04:17:16+5:30
शिरोळ : नोंदणी केलेला दस्त देण्यासाठी दाेन हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिरोळ येथील दुय्यम निबंधक प्रमोद नेताजीराव साळुंखे (वय ...
शिरोळ : नोंदणी केलेला दस्त देण्यासाठी दाेन हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिरोळ येथील दुय्यम निबंधक प्रमोद नेताजीराव साळुंखे (वय ५७, मुळ रा. उस्मानाबाद, सध्या रा. दत्त मंदिरामागे जयसिंगपूर, ता. शिरोळ) याला सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. मंगळवारी दुपारी साडेचार वाजता ही कारवाई करण्यात आली. दुय्यम निबंधक साळुंखे याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार अॅड. अमर आण्णासो बुबनाळे यांनी ९ जून रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात त्यांचे पक्षकाराचे बक्षीसपत्र केले होते त्याची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात झालेली आहे. तक्रारदार बुबनाळे यांनी नोंदणी झालेल्या बक्षीसपत्राचा दस्त दुय्यम निबंधक साळुंखे यांचेकडे मागणी केला असता साळुंखे यांनी बक्षीसपत्राचा दस्त देण्यासाठी २ हजार रुपयांची मागणी केली. यावेळी बुबनाळे यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. यानुसार लाचलुचपत विभागाने मंगळवारी सापळा रचून दुय्यम निबंधक साळुंखे याला लाच घेताना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, निरीक्षक युवराज सरनोबत, कॉन्स्टेबल शरद पोरे, विकास माने, नवनाथ कदम, सुनील घोसाळकर, सुरज अपराध यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात खळबळ उडाली आहे.
------------------------
चौकट - कार्यालय वादग्रस्त
दीड वर्षांपूर्वी याच कार्यालयातील लिपिक दिलीप लाड व खासगी उमेदवार राजेंद्र कुंभार हे लाच घेताना सापडले होते. प्लॉट खरेदी नियमितीकरणाला मूल्यांकन दाखला देण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच मागितली होती. यावेळी या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. आता याच कार्यालयातील दुय्यम निबंधक लाच घेताना सापडल्याने हे कार्यालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
फोटो - २२०६२०२१-जेएवाय-०३-संशयीत प्रमोद साळुंखे