आदर्श शिक्षण संस्थेचा कारभार शिरोटे यांच्याकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:18 AM2021-04-29T04:18:39+5:302021-04-29T04:18:39+5:30
जयसिंगपूर : कोथळी (ता. शिरोळ) येथील आदर्श शिक्षण संस्थेचा कारभार संस्थेचे सचिव ए. डी. शिरोटे यांच्याकडे देण्यात आला आहे. ...
जयसिंगपूर : कोथळी (ता. शिरोळ) येथील आदर्श शिक्षण संस्थेचा कारभार संस्थेचे सचिव ए. डी. शिरोटे यांच्याकडे देण्यात आला आहे. याबाबतचे आदेश माध्यमिक शिक्षण अधिकारी कोल्हापूर यांनी दिले आहेत. गेली वीस वर्षे संस्थेच्या कारभाराबाबत न्यायालयीन लढाई सुरू होती.
माहिती देताना शिरोटे म्हणाले, ‘‘मधल्या काळात संस्थेच्या संचालक मंडळामध्ये वाद होऊन संस्थेचा कारभार अधिकृत कोणी करायचा, याबाबत न्यायालयात प्रकरण गेले होते. त्यामुळे सन २००२ पासून संस्थेचा पीटीआर उतारा अद्ययावत होऊ शकला नाही. दरम्यानच्या काळात या संस्थेच्या संचालक मंडळाने न्यायालयाच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून पी. टी. आर उतारा बनवल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. संस्थेवर २०१८ पासून निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती; मात्र महाराष्ट्र शासनाने मार्च २०२१ मध्ये राज्यातील ज्या संस्थेत वाद आहे, त्या संस्थेचा कारभार पीटीआर उताऱ्यावर ज्यांची नावे आहेत त्यांनी पाहण्याचा आदेश प्रसिद्ध केला. त्यानुसार माझ्यासह देवगोंडा पाटील व आण्णासाहेब चुडाप्पा यांची नावे असल्यामुळे शिक्षण अधिकारी यांनी आदर्श शिक्षण संस्थेचा कारभार पाहण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, संचालक व सभासदांनी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेतली. यावेळी मंत्री यड्रावकर यांनी आदर्श शिक्षण संस्थेला लागेल ती मदत करू, असे आश्वासन दिले असल्याची माहिती शिरोटे यांनी दिली.