शिरसंगी, किणेत तिसऱ्या आघाडीमुळे निवडणूक रंगतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:19 AM2021-01-09T04:19:54+5:302021-01-09T04:19:54+5:30
आजरा : आजरा तालुक्यातील शिरसंगी व किणे ग्रामपंचायतीची निवडणूक तिरंगी होत आहे. दोन्ही गावांतील पारंपरिक लढतीबरोबर तिसऱ्या आघाडीमुळे निवडणूक ...
आजरा : आजरा तालुक्यातील शिरसंगी व किणे ग्रामपंचायतीची निवडणूक तिरंगी होत आहे. दोन्ही गावांतील पारंपरिक लढतीबरोबर तिसऱ्या आघाडीमुळे निवडणूक रंगतदार व प्रतिष्ठिेची होत आहे. साखर कारखाना संचालकांचे पाठबळ व विद्यमान सरपंच पुन्हा रिंगणात असल्याने चुरस वाढली आहे.
शिरसंगी येथे कारखाना संचालक दिगंबर देसाई, विष्णू दळवी यांच्याविरोधात माजी संचालक सुभाष देसाई, आप्पासाहेब देसाई, मधुकर यलगार यांच्यात पारंपरिक लढत गेली अनेक वर्षे होते. यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य सी. आर. देसाई, जनता बँक शाखाधिकारी बाबूराव बुडके, मनसेचे संतोष चौगुले, नाबार्ड बँकेचे अधिकारी भैरू टक्केकर यांनी तिसरी आघाडी करून चांगली चुरस निर्माण केली आहे. घरोघरी प्रचारयंत्रणा गतिमान झाली आहे. प्रत्येक मतदाराला भेटून आपल्याला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. मतदारांची प्रलंबित कामे करून त्यांना आपल्याकडे खेचून घेण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिरसंगीत २०२५ मतदान असून यमेकोंड व शिरसंगीत विभागले आहे. किणे येथे आजरा कारखाना संचालक विष्णुपंत केसरकर व ‘दौलत’चे माजी संचालक मसणू सुतार गटात पारंपरिक लढत गेली अनेक वर्षे सुरू आहे. ग्रामपंचायतीवर गेली अनेक वर्षे मसणू सुतार गटाचे वर्चस्व आहे; पण, विकास सेवा संस्था विष्णुपंत केसरकर गटाकडे आहे. या दोन्ही पारंपरिक गटांविरोधात विष्णू कातकर, रमेश नाईक, संदीप केसरकर, वसंत गुडूळकर यांनी तिसरी आघाडी केली आहे. दोन्ही गटांतील नाराज मतदारांचा लाभ उठविण्याचा प्रयत्नात तिसरी आघाडी आहे. गावातील १७१८ मतदार असून ते किणे व चाळोबावाडी येथे विभागले आहेत.
----------------------
* पारंपरिक गटाविरोधात तिसरी आघाडी शिरसंगी व किणे या दोन्ही ठिकाणी पारंपरिक दोन्ही गटांनी अनेक वर्षे सत्ता उपभोगली आहे. या दोन्ही गटांविरोधात गावातील असणारी नाराजी व वैयक्तिक लाभाची न झालेली कामे याचा फटका पारंपरिक गटांना होऊ शकतो. दोन्ही गावांत तिसऱ्या आघाडीने निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे.