शिवभोजन थाळी रविवारपासून: पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 10:59 AM2020-01-21T10:59:35+5:302020-01-21T11:00:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार रविवारी (दि. २६) प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूर शहरात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार रविवारी (दि. २६) प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूर शहरात चार ठिकाणी शिवभोजन थाळी या योजनेची सुरुवात होणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली असून, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे.
ही योजना सध्या प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असून, कोल्हापूरसाठी ६०० थाळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार १५० थाळ्यांप्रमाणे चार जणांना ठेका देण्यात आला आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हॉटेल शिवाज, कपिलतीर्थ मार्केट येथील महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्ट, सावित्रीबाई फुले रुग्णालयानजीकच्या रुद्राक्ष स्वयंम महिला बचत गट, साईक्स एक्स्टेंशन परिसरातील हॉटेल साईराज यांचा समावेश आहे. यासाठी ३० हून अधिक अर्ज आले होते; परंतु शासनाच्या निकषांत न बसल्याने या चार जणांना ठेका देण्याचे निश्चित करण्यात आले. याची वर्कआॅर्डर जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी देण्यात आली. तत्पूर्वी १६ जानेवारीला संंबंधितांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या योजनेनुसार संबंधितांनी दुपारी १२ ते २ या वेळेत शिवभोजन थाळीचे वितरण करायचे आहे. कमीत कमी ७५ ते जास्तीत जास्त १५० थाळींचे उद्दिष्ट राहणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
============================
प्रधान सचिवांनी घेतला आढावा
शिवभोजन थाळी योजनेसंदर्भात सोमवारी राज्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग(व्हीसी)द्वारे जिल्हाधिकारी दौलत देसाई व जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्याकडून आढावा घेतला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी याबाबतची सर्व तयारी पूर्ण झाली असून, संबंधितांना वर्कआॅर्डरही देण्यात आल्याचे सांगितले.
==========================================
‘अॅप’द्वारे होणार थाळ्यांची नोंदणी
शिवभोजन थाळी योजनेसाठी ‘अॅप’ विकसित करण्यात आले आहे. यामध्ये संबंधितांकडून किती थाळ्यांची विक्री झाली याची नोंदणी आॅनलाईनद्वारे मंत्रालयात समजणार आहे.
=-==================================
(प्रवीण देसाई)