शिवकालीन राजनीतीज्ञ रामचंद्रपंत अमात्य

By Admin | Published: June 5, 2015 11:57 PM2015-06-05T23:57:27+5:302015-06-06T00:24:21+5:30

पाच राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीत प्रधानपदावर राहून अलौकिक कार्य करणारे अमात्य बावडेकर यांच्या कर्तृत्वाविषयी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या त्रिशताब्दी स्मृतिदिनानिमित्त...

Shiv Chakra Politician Ramchandra Pant Amatya | शिवकालीन राजनीतीज्ञ रामचंद्रपंत अमात्य

शिवकालीन राजनीतीज्ञ रामचंद्रपंत अमात्य

googlenewsNext

हुकूमतपनाह रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांचा त्रिशताब्दी स्मृतिदिन आज, शनिवारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून पाच राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीत प्रधानपदावर राहून अलौकिक कार्य करणारे अमात्य बावडेकर यांच्या कर्तृत्वाविषयी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या त्रिशताब्दी स्मृतिदिनानिमित्त...
शिवकाळात अंगाच्या हुशारीने व पराक्रमाने जी घराणी पुढे आली आणि नावलौकिकास चढली, त्यात पंत अमात्य बावडेकर हे घराणे मुख्य होते. या घराण्यातील रामचंद्र पंडित अमात्य यांनी तर आपल्या मुत्सद्देगिरीने हा लौकिक उत्कर्ष बिंदूस पोहोचविला. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराबाईपुत्र शिवाजी महाराज व राजसबाईपुत्र संभाजी महाराज (कोल्हापूरकर) अशा पाच छत्रपतींची सेवा करण्याचा असामान्य बहुमान रामचंद्र पंडितांना मिळाला होता. सलग पाच राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीत प्रधानपदावर राहून आपले कर्तव्य निष्ठेने बजावणारे पंत हिंदुस्थानच्या इतिहासात एकमेव मुत्सद्दी असावेत.
पंत अमात्यांचे घराणे शहाजीराजे भोसले यांच्या कारकिर्दीपासून छत्रपती घराण्याशी निगडित होते. शहाजी राजांनी जी खास कर्तबगार माणसे जवळ केली होती, त्यात रामचंद्रपंतांचे आजोबा सोनोपंत हे मुख्य होते. शिवजन्माच्या वेळी खास विश्वासू म्हणून शहाजीराजांनी त्यांना जिजाबार्इंजवळ शिवनेरी किल्ल्यावर ठेवले होते. पुढे शिवाजीराजांनी आपल्या प्रधानमंडळात सोनोपंतांचे पुत्र निळोपंत यांना मुजुमदार पदावर (अमात्य) नेमले. (सन १६६२) निळोपंत मृत्यू पावल्यावर महाराजांनी त्यांचे पुत्र रामचंद्रपंत यांची निवड अमात्यपदासाठी केली. राज्याभिषेक सोहळ्यात रामचंद्रपंत दधिपूर्ण ताम्रकलश घेऊन सन्मानपूर्वक उभे होते, असा बखरीत उल्लेख आढळतो. संभाजी महाराजांनी रामचंद्रपंतांना आपल्या अष्टप्रधान मंडळात सुरनिसाचा हुद्दा (सचिव) देऊन कुडाळपासून नरगुंद तुंगभद्रेपर्यंत देश त्यांच्या स्वाधीन केला व फौजफाटा देऊन त्यांना या प्रदेशातील किल्ले व ठाणी जिंकण्याच्या मोहिमेवर पाठविले. या स्वारीत पंतांनी मोठे श्रमसाहस करून ‘देशदुर्गादि’ संपादन केल्याचा उल्लेख समकालीन कागदपत्रांत मिळतो.
सन १६८९ ला हिंदवी स्वराज्यावर भयावह संकट कोसळले. छत्रपती संभाजी महाराज पकडले जाऊन त्यांचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला. नवे छत्रपती राजाराम महाराजांना महाराष्ट्रातून जिंजीकडे निसटून जावे लागले. औरंगजेबाच्या फौजांनी जवळजवळ सर्व स्वराज्य व्यापले. त्यांनी गडकोट व ठाणी भराभर काबीज केली. राजधानी रायगड राणी येसूबाई व राजपुत्र शाहूराजे यांच्यासह मोगलांच्या स्वाधीन झाली. मराठ्यांचे राज्य बुडाले अशी सर्वत्र भावना होऊन वतनदार औरंगजेबाच्या पायाशी रूजू झाले. अशा बिकट परिस्थितीत मोगली फौजांशी लढून गेलेले प्रदेश पुन्हा जिंकून घेण्याची कामगिरी राजाराम महाराजांनी रामचंद्रपंत व शंकराजी नारायण या दोन प्रधानांवर सोपविली. सेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी या दोघांच्या हाताखाली कामगिरी करावी, असे ठरले गेले.
छत्रपती राजाराम महाराज कर्नाटकात गेल्यावर स्वराज्याच्या कारभार पदावर दोन प्रधानांची नियुक्ती झाली असली तरी त्यात रामचंद्रपंत हेच प्रमुख होते. छत्रपतींचे प्रशासकीय अधिकार दर्शविणारे ‘हुकूमतपनाह’ हे बिरूद महाराजांनी त्यांना बहाल केले होते. याचा अर्थ छत्रपतींच्या अनुपस्थितीत त्यांचा अधिकार पंतांच्या हुकमांना मिळाला होता. अशाप्रकारे छत्रपतींच्या अधिकाराने पंतांनी स्वराज्याचा कारभार सन १६८९ ते १६९७ सलग आठ वर्षे केला. सात लक्ष सेना घेऊन दक्षिणेत उतरलेल्या महाबलाढ्य औरंगजेब बादशहाशी मराठा सैन्याचे संयोजन करून सामना करणे ही काही सामान्य गोष्ट नव्हती. संताजी-धनाजीच्या मदतीने पंतांनी शत्रूने जिंकून घेतलेला प्रदेश पुन्हा काबीज केला. एवढेच नव्हे तर २५-२५ हजारांच्या फौजा उभारून या सेनानींना त्यांनी छत्रपतींच्या साहाय्यास जिंजीकडे रवाना केले.
रामचंद्रपंत हे केवळ श्रेष्ठ दर्जाचे प्रशासकच होते असे नाही, तर ते शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेले एक उत्तम लढवय्ये सेनानीही होेते. राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर अल्पावधीत त्यांनी पन्हाळ्यापासून साताऱ्यापर्यंतचा प्रदेश गडकोट ठाण्यांसह शत्रूपासून पुन्हा काबीज केल्याचे वर्णन तत्कालीन कवी केशव पंडित आपल्या ‘राजारामचरितम’ या संस्कृत काव्यात करतो. त्यानंतर १६९३ साली पन्हाळ्याला वेढा घालून बसलेल्या शहजादा मुइजुद्दीनवर पंत धनाजी व शंकराजी यांच्यासह चालून गेल्याचे व मोठी लढाई करून त्यांनी किल्ल्यात रसद पोहोचविल्याचे उल्लेख फारशी कागदपत्रात मिळतात. यावेळी पंतांच्या जवळ ८० हजार घोडदळ व अगणित पायदळ होते, अशी शत्रूपक्षाने नोंद केली आहे.
राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील कामगिरी ही पंतांच्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ कामगिरी होय. महाराणी ताराबार्इंनी पंतांच्या कार्याचा गौरव करताना ‘मोडिले राज्य सुरक्षित ठेवले’ या चारच शब्दांत त्यांच्या कार्याचे यथोचित वर्णन केले आहे. महाराणी ताराबाई आणि त्यांच्यानंतर संभाजी महाराज (दुसरे) यांच्याही दरबारात ते वडीलधारी मुत्सद्दी व सल्लागार म्हणून वावरले. फेब्रुवारी १७१६ च्या सुमारास त्यांचे निधन झाले. निधनापूर्वी त्यांनी ‘आज्ञापत्र’ नावाचा मराठेशाहीतील राजनीतीवर, विशेषत: शिवछत्रपतींच्या राजनीतीवर चिकित्सात्मक ग्रंथ रचला.
निष्ठावान स्वराज्यप्रेमी, संकटकाळातील स्वराज्याचा संरक्षक, प्रामाणिक व कुशल प्रशासक, लष्करी मोहिमांचा यशस्वी संयोजक, एक लढवय्या मुत्सद्दी व मराठ्यांच्या राजनीतीचा समर्थ भाष्यकार अशा विविध नात्यांनी रामचंद्रपंत अमात्यांच्या कामगिरीचा विचार केला तर त्यांच्यासारखा अष्टपैलू मुत्सद्दी संपूर्ण मराठेशाहीत झाला नाही, अशीच इतिहासाची साक्ष आहे. चालू वर्ष पंतांच्या पुण्यतिथीच्या त्रिशताब्दीचे आहे त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विन्रम अभिवादन.
- प्रा. डॉ. जयसिंगराव पवार

Web Title: Shiv Chakra Politician Ramchandra Pant Amatya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.