Kolhapur: अतिक्रमणमुक्तीसाठी शिवभक्त १३ जुलै'ला विशाळगडावर धडकणार - संभाजीराजे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 01:09 PM2024-07-08T13:09:32+5:302024-07-08T13:10:34+5:30
'शिवभक्त विशाळगडावर जाऊन काय करणार हे आताच जाहीर करणार नाही'
कोल्हापूर : ऐतिहासिक विशाळगडावर प्रचंड अतिक्रमण आहे. येथे कत्तलखाने आहेत. कोंबड्या, बकऱ्या कापल्या जात आहेत. मद्यपान होत आहे. यामुळे दीड वर्षापूर्वी एक बैठक घेऊन विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दीड वर्षात शासन, प्रशासनाने अतिक्रमण काढण्यासाठी काहीही केले नाही. म्हणून १३ जुलैला दुपारी दोन वाजता माझ्यासह राज्यातील शिवभक्त विशाळगडावर धडक देतील, असा इशारा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी दिला. शासकीय विश्रामगृहात आयोजित शिवभक्तांच्या बैठकीत ते बोलत होते. इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे, मंजुश्री पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, दीड वर्षात अतिक्रमण काढण्यासाठी काहीही हालचाली नाहीत. यामुळे १३ रोजी शिवभक्तांनी चलो विशाळगड मोहीम हाती घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व युद्धे सांगून केलेली नव्हती. यामुळे शिवभक्त विशाळगडावर जाऊन काय करणार हे आताच जाहीर करणार नाही. आम्हाला तिथे जाण्याचा अधिकार आहे. पोलिस व अन्य कोणीही रोखू शकत नाहीत. शिवभक्त कशालाही घाबरणार नाहीत. राज्यभरातून ते मोठ्या संख्येने विशाळगडावर पोहोचतील. कोणत्याही परिस्थितीत विशाळगडावरील अतिक्रमण खपवून घेणार नाही.
डॉ. मोरे म्हणाले, विशाळगडाला इतिहासामध्ये विशेष महत्त्व आहे. तेथील अतिक्रमण काढून ऐतिहासिक पावित्र्य जपलेच पाहिजे. अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम राबवावी प्रसंगी मोठी ताकदही दाखवू.
मंजुश्री पवार म्हणाल्या, ताराबाई पुत्र पहिले शिवाजी यांचा राज्याभिषेक विशाळगडावर झाला होता. इतके महत्त्व या गडाला आहे; मात्र आता तिथे अतिक्रमण वाढले आहे. तेथील सर्वच अतिक्रमणे निघाली पाहिजेत.
विनोद साळोखे, आबा वेल्हाळ, विजय ससे, संजय पवार, श्रध्दा माने, हेमंत चव्हाण, गीता हासूरकर, नाना सावंत यांनीही आपल्या भाषणात अतिक्रमण विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. बैठकीस फत्तेसिंह सावंत, दिलीप सावंत, विनायक फाळके आदी उपस्थित होते.
खोरं फावडं घेऊन जाऊ
१३ जुलैला विशाळगडावर जाऊन काय करणार, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. यावर शिवभक्त रुपेश पाटील यांनी आम्ही फावडं, खोरं घेऊन जाऊ, असे सुचवले. सर्वच शिवभक्तांनी संभाजीराजे छत्रपती यांनी जो आदेश देतील, त्यानुसार आंदोलन करणार असल्याचे बैठकीत सांगितले.
कोणत्याही धर्माविरोधात नाही..
विशाळगडावरील अतिक्रमण काढावे, अशी आमची ठाम भूमिका आहे. दोन्ही बाजूंची अतिक्रमणे काढलीच पाहिजे, यासाठी शिवभक्तांचा लढा सुरू आहे. लढा कोणत्याही धर्माविरोधात नाही, असा खुलासा संभाजीराजे यांनी केला. विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम कोणत्याही धर्माविरोधात नाही. इतिहास हाच धर्म समजून तेथील अतिक्रमण काढलीच पाहिजे, अशी भूमिका मंजुश्री पवार यांनी मांडली.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या मनात काय ?
संभाजीराजे म्हणाले, रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याला आल्यानंतर राज दरबारातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशाळगड अतिक्रमणमुक्तीसंंबंधी शिवभक्तांच्या मनात जे आहे तेच होईल, असे बोलले होते. पण अजूनही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी काहीही केलेले नाही. त्यामुळे यांच्या मनात काय आहे, हे आता शिवभक्तांना पाहायचेच आहे.