शिवसैनिक आक्रमक, सीमेवर कर्नाटक तपासणी नाक्यावर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 12:17 PM2021-08-05T12:17:44+5:302021-08-05T12:21:35+5:30
Shiv Sena Kagal Karnatka Kolhapur : कर्नाटक सरकारने कोरोना तपासणी महामार्गावर न करता आपल्या गावांच्या वेशीवर करावी, अशी मागणी घेऊन कोल्हापुर जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज या तपासणी नाक्यावर जोरदार अंदोलन करण्यात आले.
जहॉगीर शेख
कागल : कर्नाटक शासनाने महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर दुधगंगा नदी पुला लगत तपासणी नाका उभारून कोरोना चाचणी अहवाल असल्याशिवाय एकही प्रवासी वाहन न सोडण्याची कारवाई सुरू केली आहे. याचा फटका कोल्हापुर जिल्ह्यातील अनेक गावातील गावांना बसत आहे. कर्नाटक सरकारने ही तपासणी महामार्गावर न करता आपल्या गावांच्या वेशीवर करावी. अशी मागणी घेऊन कोल्हापुर जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज या तपासणी नाक्यावर जोरदार आंदोलन करण्यात आले.
कर्नाटक हद्दीत घुसण्याचा प्रयत्न तसेच कर्नाटकातुन महाराष्ट्रात येणारी कर्नाटक पासींग वाहने आडवीण्याचा प्रयत्न करणारया शिवसेना जिल्हा प्रमुख विजयराव देवणे, संजय पवार , तालुका प्रमुख अशोक पाटील, दत्ता सावंत, विद्या गिरी, वैभव आडके, यांच्यासह पंधरा ते सोळा शिवसैनिकांना कागल पोलीसांनी ताब्यात घेतले.
सीमा भागातील अनेक गावात जाण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक लोकांना कर्नाटक हद्दीतील महामार्गावरूनच जावे लागते.तसेच कोकण आणि गोव्याला जातांनाही हाच मुख्य मार्ग आहे. कोरोना रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने कोरोना अहवालाची सक्ती केली आहे .त्यातुन या भागात संताप व्यक्त होत आहे. कर्नाटकातील एकाही वाहनाला महाराष्ट्रात प्रवेश देणार नाही. अशी भुमीका शिवसेने घेतली.
या वेळी कर्नाटक पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांनीही पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. पण आम्हाला वरून आदेश आहेत. आम्ही यात बदल करू शकत नाही. असे कर्नाटक पोलीसांनी स्पष्ट केले. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले.