महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यास निघालेल्या शिवसैनिकांना कोगनोळीत रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 12:50 PM2021-12-13T12:50:40+5:302021-12-13T12:51:29+5:30
दरम्यान, मेळाव्यात समितीचे सदस्य दीपक दळवींना काळं फासल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ उद्या, मराठी भाषिकांकडून बंदची हाक देण्यात आली आहे.
कोल्हापूर : बेळगावात होत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यास जात असताना आज, सोमवारी कोगनोळी जवळ कर्नाटक पोलिसांनी शिवसैनिकांना रोखले. कर्नाटक पोलिसांकडून वारंवार मराठी लोकांची गळचेपी केली जात असल्याने याबाबत कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी कर्नाटक पोलिसांना जाब विचारला.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आज बेळगावात महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना निमंत्रण देण्यात आले होते. मेळाव्यास जात असताना कर्नाटक पोलिसांनी देवणे यांच्यासह काही शिवसैनिकांना कोगनोळी सीमेवरच रोखले.
कर्नाटकात आणि बेळगावमध्ये शांतता सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आपणास आम्ही कर्नाटकात सोडणार नसल्याचे यावेळी कर्नाटक पोलिसांनी सांगितले. तर, देवणे यांना या मेळाव्यास जाऊ दिले नाही. यावर देवणे यांनी कर्नाटक पोलिसांना याबाबत विचारणा केली मात्र कर्नाटक पोलिसांनी त्यांना पुढे जावू दिले नाही.
दरम्यान, मेळाव्यात दीपक दळवींना काळं फासल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ उद्या, मराठी भाषिकांकडून बंदची हाक देण्यात आली आहे.