शिवसैनिकांनी अधिकाऱ्याला चारले निकृष्ट पदार्थ
By admin | Published: December 27, 2014 12:30 AM2014-12-27T00:30:53+5:302014-12-27T00:35:00+5:30
तपासणीची मागणी : अन्न व औषध प्रशासनाविरोधात आंदोलन
गांधीनगर : घातक फरसाणा उत्पादन होत असताना अन्न व औषध प्रशासन काय करीत होते, असा प्रश्न विचारत कोल्हापुरातील अन्न व औषध कार्यालयातील अधिकाऱ्यांना आज, शुक्रवारी शिवसैनिकांनी धारेवर धरले. गांधीनगरमध्ये उत्पादित निकृष्ट पदार्थही शिवसैनिकांनी अन्न सुरक्षा अधिकारी एम. डी. पाटील यांना चारले.
पचनसंस्था बिघडविणाऱ्या निकृष्ट फरसाणा उत्पादनावर वेळीच बंदी घालायला हवी होती; पण प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे या कारखानदारांना अभय मिळाले. कारखान्यांचे परवाने रद्द तर झालेच पाहिजेत आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी व कमर्चाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी केली.
मानवी आरोग्यास घातक
ठरणारा प्रशासनाचा हलगर्जीपणा शिवसेना खपवून घेणार नसल्याचा इशारा देत तालुकाप्रमुख राजू
यादव यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. तालुकाप्रमुख विनोद खोत, उपतालुकाप्रमुख पोपट दंगट, दत्ता पाटील, राजू सांगावकर,
संदीप दळवी, सागर पाटील, बंडा घोरपडे विक्रम कोगे, आदींनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. (वार्ताहर)