खासदार धैर्यशील मानेंच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा, पोलिसांशी झटापट; पदाधिकाऱ्यांना घेतले ताब्यात
By भीमगोंड देसाई | Published: July 25, 2022 12:28 PM2022-07-25T12:28:24+5:302022-07-25T16:17:57+5:30
पक्षाने सर्वकाही देऊनही गद्दारी का केली? शिवसैनिकांकडून माने यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी
कोल्हापूर : शिवसेना प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केल्याच्या आरोपातून शिवसैनिकांनी आज,सोमवारी खासदार धैर्यशील माने यांच्या येथील रुईकर कॉलनीतील घरावर मोर्चा काढला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खासदार माने यांच्या घरासमोर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे रुईकर कॉलनी परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. यामुळे शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. परिणामी काहीवेळ वातावरण तणावपूर्ण बनले. यावेळी काही शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले.
खासदार माने दिल्लीत असून त्यांच्या निवासस्थानी मोजकेच कार्यकर्ते बसून आहेत. जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली मार्केट यार्डातील शाहू सांस्कृतिक भवनापासून मोर्चाला सुरुवात झाली आहे. मोर्चात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यावेळी शिवसैनिकांकडून माने यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यात सत्तांतर झाले. यानंतर मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे सेनेत दोन गट पडले आहेत. यातच कोल्हापुरातील खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे देखील शिंदे गटात सामील झाले. यामुळे कोल्हापुरातील शिवसैनिक संतप्त झाले. पक्षाने सर्वकाही देऊनही गद्दारी का केली, अशी विचारणा करत आज, शिवसैनिकांनी माने यांच्या घरावर मोर्चा काढला आहे. मात्र, त्याआधीच माने यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.