धैर्यशिल मानेंनंतर शिवसैनिकांचा संजय मंडलिकांविरोधात एल्गार
By भीमगोंड देसाई | Published: August 4, 2022 07:19 PM2022-08-04T19:19:06+5:302022-08-04T19:19:43+5:30
मोर्चात बेंटेक्स दागिणे परिधान केलेली मंडलिक यांची प्रतिकात्मक प्रतिमा असणार
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले खासदार संजय मंडलिक यांच्या येथील शिवाजी पार्कातील भाड्याने राहत असलेल्या घरावर सोमवारी दुपारी १२ वाजता मोर्चा काढणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी आज, गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. शाहूपुरी जिमखाना ग्राऊंडपासून मोर्चाला सुरूवात होईल. मोर्चात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी होतील असा दावा त्यांनी केला.
ते म्हणाले, कोल्हापूरचा खासदार शिवसेनेचा व्हावा, हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी प्रा. संजय मंडलिक यांना शिवसेनेची उमेदवारी देवून निवडून आणले. ते ठाकरे कुटुंबांशी विश्वासू बनले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर खासदार मंडलिक मातोश्रीवर तळ ठोकून होते. माजी मंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना शिवसेनेत आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर ठाकरे यांनी सोपवली होती. इतका विश्वास मंडलिक यांच्यावर ठाकरे यांनी टाकला होता. तरीही खासदार मंडलिक यांनी विश्वासघात करीत शिवसेना पक्षाच्या पाठीत खंजित खुपसून शिंदे यांच्यासोबत गेले.
सामान्य शिवसैनिकांनी जीवाचे रान करून त्यांना निवडून दिले. माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंडलिक यांनी सूचवलेल्या अनेक विकास कामांना भरीव निधी दिला. तरीही त्यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे असल्याचे ते म्हणाले. यावेळी जिल्हा प्रमुख संजय पवार, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सूर्वे उपस्थित होते.
बेंटेक्स दागिने...
शिवसेनेत राहिले ते खरं सोनं आणि गेले ते बेंटेक्स असा आरोप करून चार दिवसांत खासदार मंडलिक हे शिंदे गटात दाखल झाले. म्हणून बेंटेक्स दागिणे परिधान केलेल्या मंडलिक यांची प्रतिकात्मक प्रतिमा मोर्चात असेल, अशी माहिती देवणे यांनी दिली.