गव्याला वनअधिवासात सोडण्यात वनविभाग अपयशी, शिवसेनेने उपवनसंरक्षक काळे यांना धरले धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 05:00 PM2021-12-15T17:00:26+5:302021-12-15T17:05:18+5:30
गव्याला सुरक्षितपणे लवकर त्याच्या अधिवासात सोडावे. अन्यथा वनविभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेनेने दिला.
कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून गवा नागरी वस्तीमध्ये फिरत आहे. त्याला सुरक्षितपणे त्याच्या अधिवासात सोडण्यासाठी तुम्ही काय केले?, तुमच्या विभागातील कर्मचारी काय करत आहेत?, अशी विचारणा करत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कोल्हापुरातील उपवनसंरक्षक आर. आर. काळे यांना बुधवारी धारेवर धरले. गव्याला सुरक्षितपणे लवकर त्याच्या अधिवासात सोडावे. अन्यथा वनविभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनी दिला.
वनविभागाकडून गवत आणि पाण्याची व्यवस्था होत नसल्याने गवे जंगलातून नागरी वस्तीमध्ये येत आहेत. एक गवा गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरात फिरत आहे. त्यातून भुयेवाडी येथील दुर्घटना घडून एका युवकाचा बळी गेला. अजूनही गव्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात वनविभागाला यश आलेले नाही. या विभागातील अधिकारी, कर्मचारी नेमके काय करतात असा सवाल विजय देवणे यांनी उपस्थित केला.
हत्ती, गव्यासारखे वन्यप्राणी नागरी वस्तीत येणार नाहीत याबाबत उपाययोजना करण्याचे काम वनविभागाचे आहे. ते या विभागाकडून सक्षमपणे होत नसल्याचे दिसत आहे. बदल्यांच्या भानगडीत अधिकारी गुंतल्याचे दिसते. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रवचन, सल्ला देण्यापेक्षा त्रुटी दूर केल्या असत्या, तर बरे झाले असते, असे संजय पवार यांनी सांगितले. ट्रंक्युलिझर गन, पुरेसे कर्मचारी आहेत का? विचारणा करत त्यांनी आवश्यक पाऊले तातडीने उचलून गव्याला त्याच्या अधिवासात लवकर सोडण्याची मागणी केली.
त्यावर उपवनसंरक्षक काळे यांनी प्रशिक्षित कर्मचारी कार्यरत आहेत. स्वयंसेवी संस्थांची मदत होत आहे. गव्याला सुरक्षितपणे त्याच्या अधिवासात पाठविले जाईल, असे सांगितले.
यावेळी शिवसेनेचे सुजित चव्हाण, बाजीराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या मनीषा कुरणे, गीता चौगुले, मंजित माने, कृष्णात पोवार, उदय सुतार, सतीश कुरणे, उत्तम पाटील, तानाजी चौगुले, अभिजित बुकशेट, प्रवीण पालव, प्रसाद देवणे उपस्थित होते.
मयत युवकाच्या कुटुंबीयांना ५० लाख द्यावेत
भुयेवाडीतील मयत युवकांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये द्यावेत. या कुटुंबातील एकाला वनविभागात नोकरीस घ्यावे. भुयेवाडी येथील प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, अशी दुर्घटना पुन्हा घडणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, या मागणीचे निवेदन आम्ही उपवनसंरक्षक काळे यांना दिले आहे. काळे यांनी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींना कक्षाबाहेर जाण्यास सांगणे चुकीचे होते. त्याचा निषेध आम्ही केला असल्याचे संजय पवार यांनी सांगितले.