चंदगड तालुक्यात शिवसेना बॅकफूटवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:25 AM2021-08-26T04:25:35+5:302021-08-26T04:25:35+5:30
चंदगड : राज्यात सत्तेत असल्याने चंदगड तालुक्यात शिवसेना वाढणे आवश्यक होते; पण नेतेमंडळींनाच मरगळ आल्याने शिवसेना बॅकफूटवर पडली आहे. ...
चंदगड : राज्यात सत्तेत असल्याने चंदगड तालुक्यात शिवसेना वाढणे आवश्यक होते; पण नेतेमंडळींनाच मरगळ आल्याने शिवसेना बॅकफूटवर पडली आहे. त्यामुळे आतापासूनच शिवसेना वाढीसाठी प्रयत्न झाले नाहीत तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेने भाजप सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही चंदगड तालुक्यात शिवसेना वाढीसाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. याउलट महाविकास आघाडीतील दोन्ही काँग्रेसने याचा चांगला फायदा उठविला आहे. त्यांनी बऱ्यापैकी पक्षाची बांधणी केली आहे; पण शिवसेनेत तसे दिसत नाही.
गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला संग्राम कुपेकर यांच्या विजयाची खात्री असताना भाजपने बंडखोरी केल्याने हा फटका बसला होता; पण त्यानंतर शिवसेनेने पक्षाच्या पडझडीकडे लक्ष दिले नाही. खासदार संजय मंडलिक यांना खरं तर या चंदगडने आघाडी दिली; पण त्यानंतर त्यांच्याकडूनही मतदारसंघात म्हणावे तसे काम झाले नाही. सत्तेत असलेल्या शिवसेनेने चंदगड विधानसभा मतदारसंघात संपर्क प्रमुख म्हणून सुनील शिंत्रे, विधानसभा संघटक संग्राम कुपेकर व उपजिल्हा प्रमुख म्हणून प्रभाकर खांडेकर, जिल्हा महिला संघटक संज्योती मळवीकर अशी महत्त्वाची पदे देऊन तालुक्याचा सन्मान केला; पण त्यांना पक्षाकडूनच म्हणावे तसे सहकार्य मिळत नसल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हा पक्ष अडचणीत आलेला दिसून येतो. तालुक्यातील सर्वच शिवसेनेचे नेते धडाडीचे आहेत; पण त्यांच्यामध्ये संवादाचा अभाव असलेला दिसून येतो. हे पक्षाला मारक आहे.
वर्चस्वाच्या लढाईत शिवसेनेचे नुकसान
तालुक्यातील सर्वच शिवसेना नेते आक्रमक आहेत. लोकांच्या अनेक समस्या नेटाने मांडतात; पण उघड नसले तरी एकमेकांमध्ये वर्चस्वासाठी त्यांच्यात छुपा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पक्षाच्या वाढीला मारक ठरत आहे. जिल्हा प्रमुख विजय देवणे यांना हे सर्व ज्ञात असतानाही ते जिल्हा संपर्क प्रमुखांच्या कोर्टात चेंडू ढकलून मोकळे होतात.