महिला सबलीकरणासाठी शिवसेना, भगिनी मंच सदैव तत्पर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:28 AM2021-03-09T04:28:21+5:302021-03-09T04:28:21+5:30
कोल्हापूर : महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना व भगिनी मंचच्यावतीने “अभिमान मातेचा, सन्मान मुलींचा” हा अभिनव उपक्रम हाती घेतला. ...
कोल्हापूर : महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना व भगिनी मंचच्यावतीने “अभिमान मातेचा, सन्मान मुलींचा” हा अभिनव उपक्रम हाती घेतला. मुलींचा जन्मदर वाढवणे, बेटी बचाओ आणि मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढवणे, मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा व भगिनी मंच अध्यक्षा वैशाली राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
महिला भगिनींच्यावतीने सोमवारी “लेक वाचवा लेक शिकवा”, “अभिमान मातेचा, सन्मान मुलींचा” अशा आशयाचा संदेश देत भगवे फुगे आकाशात सोडले. त्याप्रसंगी शिवसेना शहर कार्यालयात क्षीरसागर बोलत होत्या.
क्षीरसागर यांनी, मंचच्यावतीने शिपुगडे तालीम, खोलखंडोबा, बाजारगेट या प्रभागात दि. ८ मार्च ते दि. ७ एप्रिल २०२१ दरम्यान जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे ५ हजारांची ठेव पावती ठेवणार असल्याचे जाहीर केले.
याप्रसंगी नंदकुमार मोरे, ऋतुराज क्षीरसागर या दोन इच्छुक उमेदवारांसह माजी महापौर सरिता मोरे, तसेच ज्योती नीलेश हंकारे, दिशा ऋतुराज क्षीरसागर, शहर संघटक मंगल साळोखे, पूजाताई भोर, पूजा कामते आदी शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी, भगिनी मंच सदस्या आणि भागातील स्थानिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
फोटो नं.०८०३२०२१-कोल-शिवसेना०१
ओळ :
महिला दिनानिमित्त शिवसेना शहर महिला आघाडी व भगिनी महिला मंचच्यावतीने सोमवारी ‘अभिमान मातेचा.. सन्मान मुलींचा’ हा उपक्रम हाती घेत आकाशात फुगे सोडण्यात आले.